पुणे : मूत्रपिंडासंबंधी दुर्मीळ विकार आणि गुंतागुंतीच्या स्थितीवर रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने लॅप्रोस्कोपिक पायलोलिथुमी आणि बक्कल म्युकोसल ग्राफ्ट (बीएमजी) या दोन प्रक्रिया एकाच वेळी यशस्वीपणे करण्याची कामगिरी पुण्यातील डॉक्टरांनी केली आहे. हे नवीन तंत्र गुंतागुंतीच्या मूत्रपिंडाच्या स्थितीत रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. याबाबतचा लेख नुकताच जर्मनीमधील ‘जर्नल ऑफ रोबोटिक सर्जरी’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला.

ज्येष्ठ मूत्रविकारतज्ज्ञ व एस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. गुरुराज पडसलगी, डॉ. सचिन भुजबळ, डॉ. सौरभ उपलेंचवार यांनी या प्रक्रिया केल्या आहेत. याबाबत डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी पोटदुखीची तक्रार घेऊन ४१ वर्षीय रुग्ण आमच्याकडे आला होता. निदानामध्ये त्यांचे मूत्रपिंड शरीरातील सामान्य नैसर्गिक ठिकाणाऐवजी ओटीपोटात असल्याचे आढळून आले.

या स्थितीला एक्टोपिक किडनी असे म्हणतात आणि ही एक दुर्मीळ जन्मजात स्थिती असते. त्याशिवाय त्याला अनेक मुतखडे झाल्याने मूत्रपिंड व मूत्रवाहिनी जोडणाऱ्या भागात अडथळा निर्माण झाला होता. साधारणत: अशा असामान्य शरीर रचना आणि गुंतागुंतीचा धोका असलेल्या स्थितीवर उपचार करणे कठीण असते.

एक्टोपिक किडनी विकारामध्ये मूत्रपिंड व मूत्रवाहिनी जोडणाऱ्या भागात अडथळे असू शकतात, परंतु मुतखडे सहसा आढळत नाहीत. असामान्य रचना, छोटी मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्यांची गुंतागुंतीची स्थिती आणि नजीकचा आतड्यांचा परिसर यामुळे कुठलीही प्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली वापरून मुतखडा काढण्याची आणि मूत्रपिंडातील बिघाड दुरुस्त करण्याची प्रक्रिया अचूकतेने एकाच वेळेस करता आली. मात्र अनेक मुतखडे आणि मूत्रमार्गाचे आधी झालेले नुकसान यामुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक होती, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारची गुंतागुंतीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. मुतखडे काढण्याबरोबरच मूत्रपिंड आणि मूत्रवाहिका जिथे मिळते त्या भागात आकुंचन आणि कडकपणामुळे निर्माण झालेला अडथळा काढून टाकण्यात आला. तोंडातील गालाच्या आतील त्वचेचा थोडासा भाग काढून तिथे बसविण्यात आला. त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून आली. त्याला शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांतच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

उपलब्ध वैद्यकीय साहित्याचा सविस्तर शोध घेतला असता एक्टोपिक पेल्विक किडनी या स्थितीत अशा प्रकारची मुतखडे काढण्याची आणि त्याचवेळेस बक्कल म्युकोसल ग्राफ्ट (बीएमजी) याची कुठलीही नोंद नसल्याचे आढळून आले. आमचा हा दावा जर्नल ऑफ रोबोटिक सर्जरी या नियतकालिकाने मान्य करत ही प्रक्रिया प्रकाशित केली आहे. – डॉ. सुरेश पाटणकर, मूत्रविकारतज्ज्ञ.