सागर कासार, पुणे

मूळचा राजस्थानचा पण सध्या पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर दुकानात काम करणारा राकेश बुगाराम मेघवाल याचे महिनाभरात लग्न होते, लग्नाच्या तयारीसाठी तो गुरुवारी सकाळी गावाला जाणार होता, पण नियतीने राकेशचा घात केला आणि गुरुवारी पहाटे राजयोग साडी सेंटरमध्ये लागलेल्या आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला.

देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला गुरुवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत राकेश रियाड (२४), राकेश मेघवाल (२०), धर्माराम बडियासर (२४), सूरज शर्मा (२५) सर्व राजस्थान आणि गोपाल चांडक (२३) लातूर या पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. या घटनेनंतर उरुळी देवाची परिसरातील साड्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली.

राकेश मेघवालचा मित्र प्रदीप नागोर याने सांगितले की, मी जवळपास तीन ते चार वर्षापासुन साड्यांचे दुकान आणि गोदामात काम करत आहे. गुरुवारी जे पाच जण या घटनेत मृत्यूमुखी पडले त्यांच्याशी माझे नेहमी बोलणे होत असत. राकेश मेघवाल हा माझा मित्र असून तो राजस्थानमधील ग्राम मेवडा गावचा रहिवासी होता. त्याच्या बाजूच्या गावातच मी राहतो. राकेशचे लग्न महिन्यावर आले असल्याने गुरुवारी सकाळी तो ट्रेनने गावी जाणार होता. सकाळी लवकर स्टेशनला जाता यावे यासाठी राकेश रात्री दुकानात झोपला होता. तो कधी दुकानात झोपत नव्हता. पण बुधवारी रात्री तो दुकानात थांबला आणि गुरुवारी पहाटे त्याला मृत्यू गाठले, असे सांगताना प्रदीपच्या डोळ्यात अश्रू आले होते.