पुणे : लोणी काळभोर आगारातून पेट्रोल आणि डिझेल भरून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागल्याची घटना हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. टँकरला आग लागल्यानंतर चालकाने उडी मारल्याने तो बचावला.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी चौकात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर हडपसर, काळेपडळ, बी. टी. कवडे रस्ता, खराडी अग्निशमन केंद्रातील बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले.
टँकरमध्ये इंधन असल्याने जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. टँकरमध्ये १५ हजार लिटर डिझेल आणि पाच हजार लिटर पेट्रोल होते. लोणी काळभोरमधील आगारातून इंधन भरून टँकर चालक पुण्याकडे निघाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. टँकरला आग लागल्याची माहिती मिळताच चालकाने उडी मारल्याने तो बचावला.
अग्निशमन अधिकारी प्रमोद साेनवणे, नीलेश लोणकर, नारायण जगताप, राजू शेख, शौकत शेख, बाबा चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रामदास लाड, अविनाश ढाकणे यांनी ही कामगिरी केली.
टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन होते. टँकरला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
