पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यामधील या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलंय.
वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांपासून तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले.
अडकलेल्या पाच जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिलीय.
नक्की पाहा >> Photos: ‘काळ’रात्र… मॉलचं बांधकाम सुरु असतानाच…; पुण्यातील दुर्घटनेचे अंगावर काटा आणणारे फोटो
“पुण्यामध्ये बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल समजल्यानंतर फार वाईट वाटलं. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती मी सांत्वना व्यक्त करतो. अपेक्षा करतो की, या अपघातामध्ये जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. “येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” असं महापौर ट्विटमध्ये म्हणाले.
पाच जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. हे कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.