पुणे शहरातील कचराप्रश्नी पालिका प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या अपशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला यश आले.  फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे २३ दिवासांपासुन निर्माण झालेल्या कचरा कोंडीचा प्रश्न अखेर सुटला आहे. फडणवीस यांनी रविवारी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी कचरा प्रश्नावर तोडगा काढल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांचे आभार मानले.

गेल्या २३ दिवसांपासून पुणे शहरातील कचरा उरळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये टाकू देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली होती.  स्थानिक नेते आणि पालिका प्रशासनाने अनेक ग्रामस्थांशी यासंदर्भात अनेक बैठकी घेतल्या. मात्र ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.  खुद्द मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.  अखेर रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. महापालिकेला एका महिन्याच्या आत कचरा प्रश्नावर आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे महापालिकेत कायम स्वरूपी कर्मचारी करण्याचा आणि कचरा डेपोमध्ये ग्रामस्थाची गेलेल्या जागेसंबंधीचा लवकरच निर्णय घेतला जाईल. यावेळी स्थानिक आमदार जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, पुणे शहरात छोटे छोटे प्रकल्प उभारले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात आली असून यावर सकारत्मकपणे चर्चा देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर या बैठकीतून कचराप्रश्नावर कायमचा तोडगा निघण्यास मदत होणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या पाठपुरव्याला अखेर आज यश मिळाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणे शहरातील कचरा प्रश्न सुटला असून मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार शहरात छोटे छोटे प्रकल्प राबविले जाणार आहेत .त्याच बरोबर एक महिन्याच्या आत मुख्यमंत्र्याना याबाबत आराखडा सादर करण्यात येईल.
कचरा डेपो कायमचा बंद करावा, यासाठी ग्रामस्थांनी डेपोच्या ठिकाणी भजन कीर्तन,जागरण गोंधळ, अर्ध नग्न आणि अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला होता. अखेर आज झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत कचरा प्रश्नावर मार्ग काढण्यात यश आले.