मांजरीतील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या परिसरात जुना बॉम्ब (ग्रेनेड) सापडल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बॉम्ब निकामी केला. बॉम्ब जुना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मांजरीतील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश वस्तू सापडल्याची माहिती पोलीस पाटील अंकुश उंद्रे यांनी पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरीत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. बाँब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले.
त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने त्याची तपासणी केली. बॉम्ब जुना असल्याचे आढळून आले. त्यानंतर तो निकामी करण्यात आला. मगर विद्यालयाच्या परिसरात आठ वर्षांपूर्वी भराव टाकण्यात आला होता. त्यात जुना बॉम्ब दबलेला होता. पावसामुळे भरावातील माती बाहेर आली. मातीखाली दबलेल्या बॉम्बवरची माती कमी झाल्याने तो आढळून आला. बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याची शक्यता असून तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.