Pune Guillain-Barré Syndrome Cases: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ अशा व्याधीची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एका महिलेला या व्याधीनं ग्रासल्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं तिच्यावर यशस्वीपणे उपचार केल्यामुळे तिने त्यावर मात केल्याचं वृत्तही समोर आलं होतं. पण आता पुण्यात या दुर्मिळ व्याधीचे तब्बल २२ संशयित रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये या व्याधीशी संबधित लक्षणं दिसून आल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातले असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या दोन रुग्णालयांव्यतिरिक्त इतरही रुग्णालयांमध्ये काही संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.

प्रशासन सज्ज, संबंधित परिसरात पथक पाठवणार!

दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, संबंधित परिसरात परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक पाठवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे. “सध्या आम्ही या भागातील एकूण सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. हे सर्व नमुने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) कडे पाठवण्यात आले आहेत”, अशी माहिती डॉ. वैशाली जाधव यांनी दिली आहे.

डॉक्टरांनी केला ‘या’ लक्षणांचा उल्लेख!

एकीकडे २२ संशयित आढळले असताना दुसरीकडे काही डॉक्टरांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही ठराविक लक्षणांचा उल्लेख केला आहे. सिंहगड रस्ता आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांकडून जुलाब, ताप आणि अशक्तपणासारख्या तक्रारी केल्या जात आहेत. “या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्याचं दिसून आलं”, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सल्लागार डॉ. समीर जोग यांनी दिली.

गेल्या आठवड्याभरातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालेल्या १६ रुग्णांनी ही लक्षणं जाणवत असल्याचं सांगितलं. त्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण धायरी, सिंहगड रोड आणि किरकटवाडी परिसरातले होते. या १६ पैकी ८ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहितीही डॉ. जोग यांनी दिली आहे. दुसरीकडे पूना हॉस्पिटलमध्ये तीन रुग्ण दाखल झाल्याची माहिती रुग्णालयाचे कन्सल्टिंग इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अजित तांबोळकर यांनी दिली. “रुग्णालयात अशा प्रकारचे तीन रुग्ण असून ते सिंहगड रोड व माणिक बाग परिसरातले आहेत”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे. तो दर वर्षी १ लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.