पेड प्लेसमेंटच्या नावाखाली प्रशिक्षण देणाऱ्या आयटी सल्लागार कंपन्याच्या चक्रव्यूहात सुशिक्षित बेरोजगार तरुण अडकत आहेत. पैसे गेले, हाती नोकरी नाही आणि आयुष्यातील महत्त्वाचा काळही गमावल्याने या तरुणांचे भवितव्य अंधकारमय होत आहे.

एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराला मासिक लाखभराच्या हमखास नोकरीचे आमिष दाखविले तर? तो एका पायावर काहीही काम करायला तयार होईल. याचाच फायदा घेऊन आयटी क्षेत्रात पेड प्लेसमेंट देणाऱ्या आयटी सल्लागार कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांच्या चक्रव्यूहात शेकडो तरूण अडकून पडत आहेत. त्यांच्या भवितव्याशी एकप्रकारे हा खेळच सुरू आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये नुकताच असाच एक गैरव्यवहार समोर आला आहे. पेड प्लेसमेंटच्या नावाखाली प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीने चारशे ते पाचशे तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून कंपनीने त्यांना आता वाऱ्यावर सोडले.

या कंपनीने उमेदवारांना आयटी क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार पायथॉन डेव्हलपर, जावा डेव्हलपर यांसारखे प्रशिक्षण अभ्यासक्रम निवडण्याची संधी देण्यात आली. पदवीधर, पदव्युत्तर पदवी घेतलेले सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या आशेने कंपनीत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ लागले. या उमेदवारांकडून कंपनीने २ ते ४ लाख रुपयांची रक्कम घेतली. त्यावेळी त्यांना हमखास नोकरी देण्याची हमी देण्यात आली. कंपनीने उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू केले. मात्र हे प्रशिक्षण केवळ जुजबी आणि नावालाच असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. मात्र, नोकरी मिळणार असल्याने उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केले.

प्रशिक्षण झाल्यानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. या परीक्षेची काठिण्य पातळी मुद्दामहून जास्त ठेवली. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही उमेदवारांना चारवेळा संधी तर काहींना सहा वेळी संधी देण्यात आली. उत्तीर्ण न होणाऱ्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यात येत असे. या परीक्षेत बोटावर मोजता येतील एवढेच उमेदवार उत्तीर्ण होत. त्यांना एखाद्या प्रकल्पावर काम करण्यासाठी नियुक्त केले जाई. प्रत्यक्षात त्यांना काहीच काम दिले जात नसे. कंपनीकडून केवळ कामाचा दिखावाच सुरू होता. कंपनीने उमेदवारांना सुरुवातीला काही महिने १५ हजार रुपये मानधन दिले. त्यानंतर मानधन देणे बंद केले. यामुळे हे उमेदवार रस्त्यावर आले आहेत. त्यांनी पैसेही गमावले आणि आयुष्यातील महत्त्वाचा काळही गमावला, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत फोरमचे अध्यक्ष पवनजित माने म्हणाले की, तरुणांना हमखास नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. कोणत्याही आयटी सल्लागार कंपनीवर उमेदवारांनी डोळे झाकून विश्वास ठेवू नये. आधी त्या कंपनीची पार्श्वभूमी तपासावी. हिंजवडीतील आयटी सल्लागार कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणी आम्ही कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली आहे. याचबरोबर ही आर्थिक फसवणूक असल्याने पोलिसांकडेही तक्रार केली आहे.

कंपनीच्या कार्यालयाला टाळे

हिंजवडी आयटी पार्कमधील या कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या पाहणीत समोर आले. याबाबत सहायक कामगार आयुक्त एस.टी.शिर्के म्हणाले की, आमच्याकडे काही उमेदवारांनी तक्रार केली आहे. या अनुषंगाने आमच्या पथकाने हिंजवडीत भेट दिली. त्यावेळी कंपनीचे कार्यालय एक ते दीड महिन्यापासून बंद असल्याचे आढळले. हा प्रकार आर्थिक फसवणुकीचा असल्याने पोलिसांना कार्यवाही करण्याची विनंती केली जाईल.

sanjay.jadhav@expressindia.com