पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुलै महिन्यात १४ हजार ६२२ घरांच्या विक्री व्यवहारांची नोंद झाली आहे. घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, ते ५६ टक्क्यांवर आले आहे. याचवेळी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांना मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.
पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यात जुलैमध्ये १४ हजार ६२२ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षातील जूनच्या तुलनेत यात ६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र, यंदाच्या जूनच्या तुलनेत त्यात १२ टक्के घट झालेली आहे. घरांच्या विक्री व्यवहारातून सरकारला जुलैमध्ये ६४८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले आहे. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते जुलै कालावधीत एकूण १ लाख ३० हजार घरांचे विक्री व्यवहार झाले असून, त्यातून ४ हजार ९८३ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क सरकारला मिळाला आहे.
पुण्यात जुलैमध्ये विक्री झालेल्या घरांमध्ये २५ लाख रुपयांपर्यंतच्या आणि २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण प्रत्येकी २८ टक्के आहे. सर्वसाधारणपणे ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेली घरे परवडणारी मानली जातात. त्यामुळे जुलैमध्ये एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ५६ टक्के आहे. गेल्या वर्षातील याच महिन्यात हे प्रमाण ५९ टक्के होते. त्यात आता ३ टक्के घट नोंदविण्यात आली. घरांच्या एकूण विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण २७ टक्क्यांवर कायम आहे. मात्र, १ ते २.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण १४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते १२ टक्के होते. तसेच, २.५ ते ५ कोटी रुपये आणि ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण अनुक्रमे २ टक्के आणि १ टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.
पुण्यातील घरांची विक्री
घरांचा आकार (चौरस फूट) – एकूण विक्रीत वाटा (टक्क्यांमध्ये)
५०० पेक्षा कमी – २३
५०० ते ८०० – ४४
८०० ते १००० – १४
१००० ते २००० – १६
२००० पेक्षा जास्त – ३