पुणे : देशातील पहिली कृषी हॅकेथॉनचे पुण्यात आयोजन करण्यात आले असून, येत्या १ ते ३ जून दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आमूलाग्र बदल करून कृषी क्रांती करण्याच्या दृष्टीने ही परिषद उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयासह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने आयोजित हॅकेथॉनचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तसेच कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत येत्या १ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३ जून रोजी समारोप होणार आहे.आठ विभागांत कृषी हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात येणार असून, देशभरातील विद्यार्थी, स्टार्ट अप आणि पारंपरिक शेती करणारे शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत.
डुडी म्हणाले, ‘या स्पर्धेसाठी एक हजार ८०० जणांनी नोंदणी केली होती. त्यातील ५६० जणांनी सादरीकरण पाठवले होते. त्यांपैकी १४० जणांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांच्या प्रयोगांचे सादरीकरण तीन दिवस करण्यात येणार आहे. खरीप हंगामात राज्याच्या वेगवेगळ्या भागांत शेतीमध्ये प्रत्यक्ष त्याचा उपयोग केला जाईल. त्यानंतर यशस्वी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी संपूर्ण करण्यात येणार आहे. या प्रयोगास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.’
हॅकेथॉनसाठी रशियातून प्रवेश अर्ज आला होता. मात्र, तो बाद ठरला. तसेच, देशातील बहुतांश सर्वच राज्यांतून प्रवेशिका दाखल झाल्या असून, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. कृषी हॅकेथॉनमध्ये शेतीच्या समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) उपाय सुचविले जाणार आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अल्पदरात तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. हवामान बदल, पाणीटंचाई, पीक संरक्षण, नासाडी, खतांचा वापर अशा विषयांवर दीर्घकालीन उपाय शोधले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.