समाजाकडून स्त्रीला बहुतेकदा दबाव आणून मुके केले जाते. मात्र, तिच्या विद्रोहाचा सूर साऱ्या जगाला ऐकावाच लागतो. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीतील अनाथांसाठीच्या संगीत शाळेतील मुलींनी शास्त्राच्या चौकटीत अडकलेल्या संगीताला मोकळे करून, मध्य युगातल्या स्त्रीवर होणारे अत्याचार, तिची घुसमट अन् स्वातंत्र्य या सगळ्यांना संगीतबद्ध केले आणि ख्रिश्चन धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या पोपलाही विद्रोहाचा सूर सुनावला. अवतीभोवती असणाऱ्या सुरांना गुंफून नव्या ‘पॉप म्युझिक’चा शोध लावणाऱ्या मैत्रिणींची संगीत कथा सांगणारा ‘ग्लोरिया’… मूकबधिर झालेल्या जगाने युद्धाकडे दुर्लक्ष केले, तर मानवताही धोक्यात येऊ शकते, असे सांगणारा… त्याही पलीकडे पांढऱ्या, काळ्या आणि करड्या रंगाच्या छटांपासून दूर जाऊन रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे स्थलांतरित झालेल्या तरुण-तरुणीला भूक आणि संभोग यांसारख्या मूलभूत गरजा भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत दाखवणारा ‘द डेफ लव्हर्स’…

शिक्षक होऊ पाहणाऱ्या मुलीच्या माध्यमातून ब्रिटिश काळात जन्मजात गुन्हेगार ठरवलेल्या जमीन, घर आणि स्थिर व्यवसायापासून वंचित असलेल्या पारधी समाजाचा संघर्ष सांगणारा ‘निर्जली’… शासकीय आश्वासने, निधी आणि घोषणांच्या पलीकडे उन्हाळ्यात विहिरीच्या तळाशी साचणाऱ्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मराठवाड्यातील दुष्काळाने ग्रासलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी सांगणारा ‘सांगळा’…

असे माणूसकेंद्री संवेदनशील सिनेमे २३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहायला मिळाले. कलेचा व्यवहार हा नेहमीच माणसाचे माणूसपण समजून घेण्यासाठी केला जातो. विविध स्थळ-काळ, परिस्थितीत, सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे घडताना माणसे नेमकी कशी जगतात, हे दाखवणारे आणि भाषेच्या मर्यादांना ओलांडून भावनेच्या धाग्याने माणसाला जोडणारे असे हे चित्रपट.

विचारांना, भावनांना आणि वेदनेला चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करू पाहणारे नवे लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासह पडद्यावर साकारलेल्या व्यवहाराला उत्सुकतेने पाहायला येणाऱ्या चोखंदळ रसिकांसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणीच. इथे सिनेमा ही आवड असलेले सगळ्या स्तरांतील लोक एकत्र येतात. चित्रपट क्षेत्रात घडणाऱ्या नव्या बदलांची, घडामोडींची कारणमीमांसा केली जाते. इथे गप्पा होतात नव्या-जुन्या, लहान-मोठ्या सिनेप्रेमींच्या. ‘आज कोणता सिनेमा पाहायचा…’, ‘हा सिनेमा बघितलाच पाहिजे…’, ‘तो खूपच भारी होता…’, ‘तो कळलाच नाही…’ अशा अनेक प्रतिक्रिया सात दिवस चाललेल्या या महोत्सवात ऐकायला मिळाल्या.

एका दिवशी दोन, तीन ते आठ सिनेमे पाहणारी माणसेही भेटली. प्रत्येकालाच चांगली जागा पकडण्यासाठी रांगेत थांबण्याची घाई असते; कारण कोणालाही अनुभवात काहीच कमी ठेवायचे नसते. या चित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांची मोठी धडपड चाललेली दिसते. त्यांना सिनेमासोबतच वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रे, सादरीकरणे चुकवायची नसतात. जगभरातून आलेल्या चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटण्याची संधीही हुकवायची नसते, प्रश्न विचारायचे असतात. नवीन काही तरी जाणून घ्यायची उत्सुकता या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते.

याच महोत्सवात प्रेक्षकांसमोर एका मिनिटाचा लघुपट तयार करून दाखवत दिग्दर्शक पाको टोरेस यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कोणत्याही साधनांशिवाय चित्रपट बनवता येतो, हे सिद्ध करून दाखवले. मात्र, मानवी बुद्धिमत्तेशिवाय ही सगळी साधने निरोपयोगी ठरतात. त्यामुळे साधनांपेक्षा कल्पनेवर अधिक जोर द्यायला हवा, सिनेमा हा केवळ बोलपट नसतो, चित्रपटांनी बोलण्यापेक्षा दाखवण्यावर अधिक भर द्यायला हवा. अभिनेता व्हायचे असेल, तर प्रसिद्धीच्या मागे न लागता स्वप्न समोर ठेवून काम करायला हवे… हे आणि असे धडे बोमन इराणी, परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, किशोर कदम यांच्यासारख्या दिग्गजांनी दिल्याने अधिक अधोरेखित होणारे. चित्रपटांविषयी उत्सुकता असलेला प्रत्येक जण या महोत्सवातून काही ना काही घेऊनच गेला.

कल्पनेला मोठ्या पडद्यावर साकारायचे असेल, तर नव्या-जुन्या सगळ्यांनाच हा महोत्सव नक्कीच दिशा देणारा ठरला. चित्रपट ही अत्यंत व्यक्तिसापेक्ष बाब आहे. त्यामुळे महोत्सवातून बक्षिसे मिळवणारे ‘आरमंड’, ‘एप्रिल’, ‘डार्केस्ट मिरीयम’, ‘टू अ लँड अननोन’ या आंतरराष्ट्रीय आणि ‘सांगळा’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘रावसाहेब’, ‘गिरण’, ‘निर्जली’ या चित्रपटांबरोबरच ‘लव्हेबल’, ‘द युनिव्हर्सल लँग्वेज’, ‘कारकेन’, ‘लच्ची’ आणि ‘तेंडल्या’सारखे माणसांची कथा सांगणारे चित्रपटही रसिकांची दाद मिळवून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(tushar.suryawanshi@expressindia.com)