पुण्याच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन दोडके रिंगणात आहेत. पुन्हा निवडून येण्यासाठी मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर भीमराव तापकीर यांची मदार आहे. सचिन दोडके हे नगरसेवक असून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

पण २००९ साली मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे इथून निवडून आले. तेव्हापासून राष्ट्रवादीला खडकवासलामध्ये आपला आमदार निवडून आणता आलेला नाही. रमेश वांजळे यांचे अकाली निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी भीमराव तापकीर पहिल्यांदा निवडून आले. २००२ साली भीमराव तापकीर भाजपाच्या तिकीटावर पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेवर निवडून आले. त्यानंतर नगरसेवकपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना खडकवासलामधून पोटनिवडणुकीचे तिकीट मिळाले.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्वपक्ष अशी लढत झाली. तापकीर ४ हजार मतांनी निवडून आले. सचिन दोडके यांना २००२ साली राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलीत. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत केले. २००७ साली त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. तेव्हापासून सलग तीन टर्म ते नगरसेवक आहेत. वारजे, कोथरुड धनकवडी, सिंहगड आणि खडकवासलाचा भाग या मतदारसंघात येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खडकवासलाच्या ग्रामीण भागामध्ये रस्ते पायाभूत सुविधा या मागण्या आहेत तर शहरी भागात वाहतूक कोंडीची समस्या आहे. तपाकीर यांना प्रस्थापितांविरोधातील लाटेचा सामना करावा लागू शकतो तर दोडके यांच्यासमोर लोकसभेतील पक्षाची कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे.