कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी वाकड परिसरातील फ्लॅटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. दरम्यान, साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच त्यांना काही व्यक्ती त्रास देत असल्याचे समोर आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देण्यात आली होती, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असंही तक्रारीत म्हटलेलं आहे.

पाच आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करून वेळोवेळी फसवणूक केली असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. पाचही आरोपींच्या जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचं सोनाली यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.

आत्महत्येपूर्वी राजेश साप्ते काय म्हणाले होते?

“नमस्कार,….मी राजेश मारुती साप्ते! मी आर्ट डायरेक्टर आहे. मी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी, पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलं आहे. माझी कुठलीही कंप्लेन्ट तिकडे नाही. राकेश मोरया युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दामहून फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की, राजू सापते यांनी एक का देड दिया नहीं… हे कालही मी क्लिअर केलं आहे. नरेश मिस्त्री नावाच्या व्यक्तीने पण फोन करून विचारलं असता त्यांनी ही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे. नरेश मिस्त्री यांनी सांगितलं की आजपर्यंत दादांनी कुठलंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मोरया हे मला खूप सतावत आहेत. ते माझं कोणतंही काम चालू करू देत नाहीत. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. ज्याचं मला, इमिजेट काम सुरू करायच आहे. त्यातला एक प्रोजेक्ट काल मला झीचा सोडून द्यावा लागला. कारण मला ते कामच करू देत नाहीत. दशमी क्रियेशनचं काम चालु असताना ते त्यांनी थांबवलं आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा….धन्यवाद!.”