पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्यावर केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती पुढील दोन दिवसांत सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच या निवडणुकीसाठी बंगळुरूहून पुण्याला ४२०० मतदान यंत्रे दाखल झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मतदान केंद्रांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असते. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची यादी, मतदान यंत्रे, मतदानासाठी आवश्यक साहित्य याबाबत नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक शाखेकडे मतदान साहित्याबाबतची माहिती तातडीने मागविण्यात आली आहे.

हेही वाचा – मेट्रोचे गौडबंगाल : पुणे मेट्रो सेवा सुरू करण्यास दिलेल्या मंजुरीची माहितीच नाकारली

पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात मिळून एकूण १९ लाख ७२ हजार ३७२ मतदार असून, दोन हजार मतदान केंद्रे आहेत. मतदानासाठी लागणारी मतदान यंत्रे म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी १२ हजार ६०० यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे आहेत. तसेच नुकतीच बंगळुरूहून ४२०० मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. या यंत्रांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. या तपासणीत पोटनिवडणुकीत वापरण्यायोग्य यंत्रे, अतिरिक्त आणि पर्यायी यंत्रांची उपलब्धता, त्यांची सुरक्षा व्यवस्था आदी तयारी कोरेगाव पार्कमधील भारतीय खाद्य गोदाम येथे करण्यात येत आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या देखरेखीखाली ही तपासणी सुरू असून तलाठी, मंडल अधिकारी, महसूल विभागातील कारकून हे तपासणीचे काम करत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. खासदार बापट यांच्या निधनामुळे पुण्याच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार किंवा नाही, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मात्र, नुकतीच पुण्याला आलेली मतदान यंत्रे, निवडणूक आयोगाने मागविलेली मतदान साहित्याची माहिती पाहता पोटनिवडणूक जाहीर होण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – मुंबई-पुण्याची घरांच्या विक्रीत देशभरात आघाडी

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप पोटनिवडणुकीबाबत कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. मात्र, मतदान साहित्याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच नुकतीच बंगळुरूहून पुण्यासाठी ४२०० मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. – भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune lok sabha by election movement speeds up letter sent by election commission pune print news psg 17 ssb
First published on: 23-05-2023 at 10:37 IST