पुणे : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या सलग पाच वेळा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या राहिल्या आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना तिकीट नाकारून, पक्षाने जिल्हा परिषद आणि विधानसभेला पराभूत झालेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून भावना गवळी यांना तिकीट नाकारल्याची राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज राज्यातील अनेक घडामोडींबाबत भूमिका मांडली.
आणखी वाचा-पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचाराला अजित पवार येणार?
पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांना तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, माझी आणि भावना गवळी यांच्यासोबत तिकिटाबाबत चर्चा झालेली नाही. तसेच मध्यंतरी झालेल्या अनेक कार्यक्रमात भावना गवळी म्हणाल्या की, मला यवतमाळवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तसेच भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्याचे कारण मला अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलंं नाही. भावना गवळी यांची योग्य पद्धतीने काळजी घेऊ, त्यांचा मानसन्मान राखला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. त्यामुळे भावना गवळी यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अन्याय होऊ देणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.