पुणे : ‘भाषा, कविता आणि संस्कृती हा परस्परांशी एकरूप झालेला त्रिवेणी गोफ आहे. भाषा ही अस्तित्वगंध आहे. तिला अस्मितेचा दर्प येऊ देता कामा नये,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ कवयित्री-समीक्षक डाॅ. नीलिमा गुंडी यांनी शनिवारी व्यक्त केली. ‘शिक्षणामध्ये मराठी हीच प्रथम भाषा असली पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘भाषा, कविता आणि संस्कृती’ या विषयावर सुंदराबाई सुराणा स्मृती व्याख्यान पुष्प डाॅ. नीलिमा गुंडी यांनी गुंफले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
‘भाषेच्या पोटातील भाषेचा वापर करता येऊ शकणारा काव्य हा श्रेष्ठ साहित्यप्रकार आहे. समृद्ध मराठी काव्यपरंपरेतून संस्कृतीच्या प्रवाहीपणाचा प्रत्यय येतो. उपदेश न करताही कवी कळत-नकळतपणे मूल्यांची रुजवण करत असतात. कविता ही नेमकी आणि अर्करूप असते. कविता ही संस्कृतीची टीका, असे माधव ज्युलियन यांनी म्हटले आहे. भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा वेध घेणारी कविता वातावरणाने परिपुष्ट आहे.’ असे गुंडी म्हणाल्या.
‘स्त्रीमुक्ती चळवळ ही गेल्या पन्नास वर्षांतील घडामोड आहे. पण, ‘नाही मी नुसती मादी, मी माणूस आधी’ या काव्यपंक्तीतून पद्मा गोळे यांनी स्त्रीवादाची भूमिका पूर्वीच मांडली होती. सांस्कृतिक बदलाची चाहूल आणि वास्तव जगाचे भान हेदेखील कवितेतून दिसते. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ असे म्हणणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या कवितेतून प्रेमाचे प्रतीक असलेल्या चंद्राचे वेगळेच दर्शन घडते. भाषा, संस्कृती, कविता कर्मठ असून चालत नाही, तर ती लवचीक असावी लागते. भाषा किती स्फोटक आहे, हे नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून जाणवते. ‘श्रीगणेशा’ म्हणजे सुरुवात हा शब्दप्रयोग आता वाक्प्रचार झाला आहे. त्याला वेगळे परिमाण देणाऱ्या नीरजा यांचा ‘स्त्रीगणेशा’ हा कवितासंग्रह लक्षणीय आहे,’ असे गुंडी यांनी नमूद केले.
मराठी भाषेतून होणारी नवनिर्मिती ही भाषेची संजीवनी आहे. नव्या अर्थच्छटा उलगडणारे शब्द योजून साधलेली नवी भाषा, नव्या प्रतिमा आणि नवी रूपके यांचा योग्य उपयोग करून घेऊन कवींनी मराठी काव्यपरंपरा प्रवाहित ठेवली आहे. डाॅ. नीलिमा गुंडी, ज्येष्ठ कवयित्री-समीक्षक