पुणे : गणेशोत्सवामुळे फळभाज्यांना मागणी कमी झाली असून, कोबी, ढोबळी मिरची, शेवगा, घेवड्याच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती फळभाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
राज्य, तसेच परराज्यातून रविवारी ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरमधून ९ ते १० टेम्पो गाजर, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकामधून मिळून ४ ते ५ टेम्पो भुईमूग शेेंग, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार ४०० ते ५०० गोणी, कांदा ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
गणेशोत्सवामुळे फळांना मागणी
गणेशोत्सव, तसेच गौरी आगमनानिमित्त सर्व प्रकारच्या फळांच्या मागणीत वाढ झाली. कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. आवक वाढल्याने सफरचंदांच्या दरात घट झाली. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ८० ते ९० टन, संत्री १० ते १२ टन, डाळिंब ६० ते ७० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे ६०० ते ८०० गाेणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, चिकू अडीच हजार डाग, पेरू ६०० ते ७०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), अननस ५ ट्रक, बोरे १० ते १५ पोती, सीताफळ १० ते २० टन, तसेच सफरचंद ८ ते १० हजार खोकी अशी आवक झाली.