सर्वोच्च न्यायालायने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीस बंदी घातली आहे. मात्र हे रस्ते महापालिकेत घेण्यात यावे. यासाठी पालकमंत्री पुढाकार घेत असून या विरोधात शिवसेनेच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे काही तास होत नाही. तोवर महापौर मुक्ता टिळक यांनी महामार्गावरील ५०० मीटर हद्दीतील दारूबंदी बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास प्राधान्य द्यावे, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे पालकमंत्र्याना घरचा आहेर मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्वोच्च न्यायालायने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या परिसरात दारू विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. या घडामोडीच्या मागे पालकमंत्री गिरीश बापट हे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरात हे रस्ते येता कामा नये. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महापालिकेत भजन करीत आणि पालकमंत्र्याच्या फोटोला दारुच्या बाटल्यांची माळ घालून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी महामार्गावरील ५०० मीटर हद्दीतील दारूबंदी बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास प्राधान्य द्यावे, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले. आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.