एकेकाळी मध्यवर्गीय माणसाचं स्वप्न असायचं.. आयुष्यभर कामधंद्यासाठी जगभर पायपीट करावी.. कोठेही चाकरमानी करावी.. हवी तेवढी पुंजी गाठीला बांधावी पण अखेरचा श्वास मात्र पुण्यातच सोडावा.. तोही गायकवाडवाडय़ावरून वाजत गाजत ओंकारेश्वरी.. आता ‘श्वास’ सोडायला काय घ्यायलासुद्धा पुण्यात जागा मिळणे मुश्किल.. इतक्या झपाटय़ाने पुणे बदलतंय की पुण्यातल्या माणसाला सुद्धा शहर अनोळखी वाटावे.. खरं तर पानशेतच्या पुराबरोबरच पुण्याच्या अनेक खुणा पुसल्या गेल्या. पण गेल्या चार-पाच दशकांत ‘मुठा’ नदीतून इतके पाणी वाहून गेले आहे की शहराचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. शहराने निरनिराळे ‘मुखवटे’ धारण केल्यामुळे आज पुण्याचा मूळ चेहरा लुप्त झाला आहे. राजकारणी आणि बिल्डर्स यांनी पुण्याला नामशेष करण्याचा चंग बांधल्यामुळे पुण्याचा प्रवास आता ‘पॅरीस’ च्या दिशेने वेगाने सुरू आहे. स्थावरात्मक घडामोडीबरोबरच येथील शिक्षण, समाजकारण, संस्कृती, राजकारण यामध्ये कमालीचा कायापालट झाला आहे. शनिवारवाडय़ाचे ढासळलेले बुरुज आता नव्या सिमेंटने सांधले जात आहे.
विविध क्षेत्रांत पुण्याने मुसंडी मारली असली तरी इतिहासकाळापासून पुण्याची ख्याती ही विद्यानगरी म्हणूनच! आजही ती आहे, पण एके काळी पुण्याचा बुटका प्राध्यापक मुंबईकरांच्या उंच हवेलीसमोरून चालू लागला तर त्या हवेल्या शरमेने खाली झूकत होत्या. देशभर पुण्याचा शैक्षणिक दबदबा होता. मुठा नदीचे ‘पाणी’ पिण्यासाठी देश-विदेशीचे तल्लख विद्यार्थी आसुसलेले असायचे. जगाला अनेक प्रकांडपंडित या शहराने पुरविले आहेत. आता मात्र शिक्षणसम्राटांनी पुण्यात ‘डिग्ऱ्या’ विकण्याचे कारखाने सुरू केले आहेत. पुण्याच्या उद्योग-धंद्यात शिक्षणाच्या नव्या धंद्याची भर पडली आहे.
(सु. २०० वर्षांपूर्वी) माऊंट स्टुअर्ट एलिफिन्स्टनसारख्या दूरदर्शी इंग्रजी वकिलाने पुण्याच्या विश्रामबागवाडय़ात पहिली इंग्रजी शाळा सुरू केली आणि शैक्षणिक शहर म्हणून पुण्याचा श्रीगणेशा झाला. पुढे याच शाळेचे ‘कॉलेज’ मध्ये रूपांतर होऊन खडकीला स्थलांतर झाले आणि या ‘पूना कॉलेज’चे ‘डेक्कन कॉलेज’ म्हणून नामकरण झाले. याच कॉलेजमधून पुढे टिळक, आगरकर, चिपळूणकर, गोखले यांसारखे विद्यार्थी आंग्लाविद्या शिकून तयार झाले आणि पुढे याच मंडळींनी पुढाकार घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. परिणामी १८८० न्यू इंग्लिश स्कूल, १८८५ फग्र्युसन कॉलेज, १९१६ एस.पी. कॉलेज अशा अनेक संस्था पुण्यात उभ्या राहू लागल्या.
पुण्याचा सनातनी चेहरा लुप्त होऊन ‘विद्वानांचे शहर’ म्हणून पुण्याचा नावलौकिक वाढू लागला. भांडारकर इन्स्टिटय़ूट, भारत इतिहास संशोधन मंदिर, गोखले इन्स्टिटय़ूट, त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, डिफेन्स अॅकॅडमी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, शस्त्रास्त्रे व दारुगोळा संशोधन संस्था, राष्ट्रीय जलसंशोधन संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, अॅटोमोबाईल रीसर्च इन्स्टिटय़ूट, फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिटय़ूट, लष्करी अभियांत्रिकी कॉलेज अशा अनेक राष्ट्रीय पातळीवरील संस्थांचे जाळे पुण्यात विणले गेले.
पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून पुणे कीर्तिमान होऊ लागले. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर तर पुण्यात शेकडो महाविद्यालये नव्याने सुरू झाली. कोणत्याही विद्याशाखेचा विद्यार्थी शिक्षणासाठी प्रथम पसंती पुण्याला देऊ लागला.
लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, आगरकरांपासून ते रँग्लर परांजपे, रँग्लर महाजनी, दत्तो वामन पोतदार, डॉ. धनंजयराव गाडगीळ, द. गो. कर्वे, डॉ. बाबासाहेब जयकर, सोनोपंत दांडेकर यांसारख्या थोर व्यासंगी व व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वांची परंपरा पुण्याला लाभली.
अलीकडच्या काळात पुण्यात नव्याने अनेक अभिमत विद्यापीठे व महाविद्यालये सुरू झाली आहेत. पण त्या संस्थांनी पुण्याच्या शैक्षणिक परंपरेला ‘छेद’ देत शिक्षणाला बाजारू स्वरूप आणले हे कटू वास्तव आहे.
पुण्याच्या शैक्षणिक वैभवाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ हे की महात्मा फुल्यांनी पहिली मुलींची शाळा सिटी पोस्टाजवळ सुरू केली. त्यानंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, नाथीबाई ठाकरसी महाविद्यालय, कन्याशाळा, हुजूरपागा अशी अनेक शाळा-कॉलेज पुण्यात आली. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अनेक इंग्रजी शाळा कॅम्प भागात सुरू झाल्या. या सर्व सुविधांमुळे पुण्याचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले.
पुण्याच्या शैक्षणिक प्रवासाबरोबरच येथील ‘खाद्य-संस्कृती’ मध्येही कमालीचे परिवर्तन होऊ लागले. हॉटेलमध्ये खाणे त्यावेळच्या सनातनी संस्कृतीला मान्य नव्हते. त्यामुळे त्याकाळी पुण्यात तुरळक खानावळी होत्या. काही ‘इराणी’ लोकांनी हॉटेल सुरू केली. तर ती त्याकाळी बंद पाडण्यात आली. पुढे टिळक रस्त्यावर ‘जीवन रेस्टारंट’ किंवा बादशाही, फडतरे चौकात स्वीट होम पेशवाई, दत्त उपाहार गृह, संतोष भवन, बॉम्बे विहार, आनंद विलास श्रीकृष्ण भवन, अण्णा बेडेकरांची मिसळ आणि मंडई परिसरात काही हॉटेल्स सुरू झाली. कावरे आईस्क्रिम किंवा बुवा आईस्क्रिम, गणू शिंदे ही त्याकाळातील उन्हाळे गार करीत असत.
पुढे मात्र विद्यार्थ्यांचे लोंढे जसजसे वाढू लागले तसतशा नवनवीन खानावळी, हॉटेल पुण्यात वेगाने वाढू लागले.
पिंपरी-चिंचवड भागात औद्योगिक वसाहत सुरू झाल्यानंतर पुण्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढू लागली. आणि पुणेकर नव्या खाद्य संस्कृतीमध्ये पूर्णपणे समरस झाला.
गावाच्या बाहेर लकडी पुलापलीकडे कासिमशेठचे गुडलक हॉटेल, लकी रेस्टारंट, कॅफे सनराईज, अलका चौकात रिगल, रास्ता पेठेत न्यूयॉर्क रेस्टारंट, स्वारगेट भागात व्होल्गा, कॅम्प भागात कॅफे नाझ अशा कितीतरी इराण्यांनी पुण्यात आपले बस्तान बसविले.
इराणी हॉटेलात गुपचूप जाऊन ‘झ्यूक बॉक्स’ मध्ये चार आणे टाकून देव आनंद, राज कपूर किंवा त्याहीपेक्षा जुन्या गाण्यांच्या तालावर डोलत चहापाव, क्रिमरोल, ब्रून किंवा ब्रेडबटर हादडणे ही त्या काळची चंगळ मानली जायची.
इराण्यापाठोपाठ पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर सर्वात जास्त वर्चस्व उडपी कंपनीने सुरू केले. डेक्कन भागात अनेक उडप्यांची हॉटेल सुरू झाली. फग्र्युसन कॉलेज रस्ता म्हणजे त्या काळातही पुण्यातला सर्वात चिरतरुण रस्ता होता. त्या रस्त्यावर मद्रास कॉफी हाऊस, मद्रास लंच होम (रूपाली/ वैशाली), कर्नाटक क्लब, हॉटेल कॅफे डिलाईट. पुढे जिमखान्यावर अप्पाची खिचडी, हॉटेल मोतीमहल, चालुक्य, मॉडर्न कॅफे अशा शेकडो शेटी मंडळींनी पुण्याचा खाद्य व्यवसाय हळूहळू काबिज केला व आजतागायत पुण्याच्या हॉटेल व्यवसायावर दाक्षिणात्य लोकांचेच वर्चस्व आहे.
आता तर पुण्यातल्या माणसाने ‘घरी’ खाणेच बंद केले असावे, इतकी तुडूंब गर्दी हॉटेलामध्ये असते. नवनव्या प्रकारची हॉटेल पुण्यात येऊ लागली आहेत.
हजारो प्रकारचे आईस्क्रिम पार्लर्स, कॅफे कॉफी डे (सीसीडी), बरिस्ता, पिझाहट, सबवे , पावभाजी सेंटर आता पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवत आहेत. त्यातच भर आता अनेक ठिकाणी डिस्कोबार, हुक्का पार्लर्स यामुळे पुणे आता पॅरीसच्या अगदी निकट पोहोचले आहे. अधूनमधून या शहरात रेव्हापाटर्य़ा, चिल्लर पाटर्य़ासुद्धा आयोजित केल्या जात असतात. काँटिनेन्टल, चायनीज, इटालियन थाई असल्या अनेक बेचव पदार्थानी बेसुर रॉक संगीताबरोबरच पुण्यात शिरकाव केला आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून आलेली मुले या पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये सहजपणे रममाण झालेली दिसतात. हा पुण्याचा मुखवटा घातक की विधायक हे ज्याचे त्याने ठरवावे.
ज्या शहराने अनेक विद्वान, शास्त्रज्ञ निर्माण केले. ज्या शहराने देशाला स्वातंत्र्याचा राजमार्ग दाखविला. ज्या पुणे महापालिकेत एके काळी महात्मा फुले, प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, नारायण वैद्य यांसारखी अभ्यासू, चळवळीतील माणसे बसत होती. त्याच मनपामध्ये आज ‘आधुनिक स्वातंत्र्य लढय़ातील योद्धे राज्यकारभार करीत आहेत. किमान ४२ गुन्हे केल्याशिवाय कुठलाही ‘पक्ष’ तिकीट देत नाही. ४२ च्या लढय़ातील या आधुनिक महापुरुषांनी पुण्यामध्ये काँक्रीटचे जंगल उभे केले आहे. ज्या प्र.के.अत्र्यांनी पुण्याची सार्वजनिक वाहतुकीची संकल्पना दिली त्याचे वाटोळे करून टाकले आहे. आता पुण्यात फिरायचे असल्यास पुन्हा एकदा टांगे आणि सायकलीच आणाव्या लागतील. नाहीतर रजनीश आश्रमाजवळच्या नॉर्थ मेनरोडवर उभे राहावे आणि आपण पॅरीसमध्ये आहोत असेच समजावे. कारण आता पुण्याचे ‘पॅरीस’ होण्यास वेळ लागणार नाही.