पुणे- मुंबई लोहमार्गावर मळवलीजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या प्रकारामुळे लोणावळा- पुणे दरम्यान धावणाऱ्या काही गाडय़ा सकाळी उशिराने धावत होत्या.
लोहमार्गाची तपासणी करणाऱ्या पथकाला सकाळी साडेसहाच्या सुमारास मळवली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने जाणवले. त्यानंतर त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यामुळे मुंबईहून- पुण्याकडे येणाऱ्या गाडय़ा तातडीने थांबविण्यात आल्या. घटनास्थळी दुरुस्तीचे पथक दाखल झाल्यानंतर सुमारे तासाभरात दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
या प्रकारामुळे इंदौर- पुणे या गाडीला पुणे स्थानकावर पोहोचण्यास सुमारे एक तासांचा विलंब झाला. त्याचप्रमाणे लोणावळा- पुणे दरम्यान धावणाऱ्या सकाळच्या वेळेतील लोकल वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळच्या वेळी प्रामुख्याने विद्यार्थी व नोकरदार वर्ग लोकलमधून प्रवास करतो. लोकल विलंबाने धावत असल्याने अनेकांची गैरसोय झाली.