पुणे : महापालिकेच्या खेळांच्या मैदानांवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केल्यानंतरही सणस मैदानाच्या परिसरात ढोल पथकांनी चक्क मैदान, पाण्याची टाकी आणि प्रवेशद्वारावरच वादनाच्या सरावासाठी शेड उभारले असल्याचा आरोप होत आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत विचारले असता, महापालिकेने कोणत्याही पथकाला परवानगी दिली नाही. पाहणी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.

सध्या शहरातील विविध ठिकाणी ढोल पथकांचे सराव सुरू आहेत. नदीपात्रातील रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत, घाटांसह शहर व उपनगरांसह मोकळ्या व बंदिस्त मिळकतींमध्ये सराव सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या सारसबागेजवळ असलेल्या सणस मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार, बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर, ढोल पथकांनी सराव सुरू केला होता.

यंदा मात्र ढोल पथकांना या ठिकाणी परवानगी न देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने सणस मैदानावरील ६ ढोल पथकांचे, नेहरू स्टेडियम परिसरातील ४, सप्तगिरी बालाजी क्रीडांगण, घोरपडी येथील १ आणि हडपसर हँडबॉल स्टेडियम, माळवाडी येथील एक असे १२ प्रस्ताव फेटाळले होते. तसेच, महापालिकेच्या सांस्कृतिक विभागानेदेखील गणेश कला क्रीडा मंच परिसरात परवानगी ढोल वादनासाठी परवानगी देण्यास असमर्थता दर्शविली होती.

‘गणेशोत्सवातील ढोल पथकांचे महत्त्व लक्षात घेऊन सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र, मैदानांवर कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. कोणाला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी परवानगी दिली जाईल,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच स्पष्ट केले होते.

मात्र, महापालिकेच्या परवानगीची वाट न पाहता गुरुवारी सकाळपासून सणस मैदान परिसरात ढोल पथकांनी सरावासाठी शेड टाकण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारासह येथील बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर शेड उभारण्याचे काम हाती घेतल्याचा आरोप आहे. याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यावर बोलण्यास कुणी तयार नव्हते. मात्र, येथे कोणालाही परवानगी दिली नसल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनीच स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय दबावाची चर्चा

खेळांच्या मैदानांवर ढोल पथकांना सरावासाठी परवानगी द्यावी, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा हट्ट आहे. सत्ताधारी असल्याने पथकांना सरावासाठी मैदाने देण्यात येईल, असा शब्द माननीयांनी पथकांच्या प्रमुखांना दिल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत मैदानावर शेड उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र या प्रकारामुळे खेळाडू आणि क्रीडा प्रेमी यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.