पुणे : ‘टँकरने पाणी देताना नागरिकांकडून जादा शुल्क आकारू नका,’ अशी तंबी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी टँकरचालकांना बुधवारी दिली. टँकरचालकांनी जादा पैशांची मागणी केल्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करा, असे आवाहन आयुक्तांनी केले.गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी बुधवारी महापालिकेत टँकर चालक-मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांना वेठीस धरून टँकरसाठी वाढीव दर आकारू नये, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून टँकर भरून घेऊन नागरिकांना पोहोचविण्यासाठी निश्चित किती खर्च येतो, याची माहिती घेण्यात आली. टँकर भरण्याचे ठिकाण आणि ज्या ठिकाणांवरून टँकरची मागणी झाली आहे, त्यामधील अंतर यावर टँकरचे दर घेतले जातात. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता विनाकारण दर आकारू नका, अशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ज्या भागात महापालिकेला पाणी देता येत नाही तेथे महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणी दिले जाते. आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे, खराडी या भागांतून टँकरसाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी दिला. मात्र, टँकरचालक नागरिकांकडे पैसे मागत असल्याच्या काही तक्रारी समोर आल्या आहेत. जे टँकरचालक नागरिकांकडून पैसे मागतील त्यांची तक्रार पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे करावी. शहरातील टँकरची मागणी आणि त्यासाठी घेतले जाणारे शुल्क याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विहीर तसेच बोअरवेलमधून स्वच्छ पाणी द्या’
महापालिकेच्या टँकर भरणा केंद्राबरोबरच बोअरवेल तसेच विहिरीमधून पाणी भरून ते टँकरद्वारे पोहोचवले जाते. हे पाणी देताना ते शुद्ध असेल, याची खात्री संबंधित टँकरचालकांनी आणि मालकांनी करून त्यानंतरच त्याचे वितरण नागरिकांना करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली. पाणीपुरवठा करताना त्यामध्ये आवश्यक प्रमाणात क्लोरिन टाकण्याच्या सूचनाही भोसले यांनी दिल्या.