पुणे : शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील असलेल्या महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता कचरा गोळा केल्या जाणाऱ्या ठिकाणांची (फिडर पाॅइंट्स) पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. या फिडर पाॅइंट्सचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प आयुक्तांनी केला असून, त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नगर रोड-वडगाव शेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या झिरकन, साकोरेनगर आणि यमुनानगर फीडर पॉइंट्सची पाहणी करत आवश्यक ती माहिती घेतली. फिडर पाॅइंट्सचे आवश्यक ते सुशोभीकरण करण्याबरोबरच नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत अधिक जागरूक करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सफाई मित्रांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद व घराघरातून घंटागाडीमार्फत होणाऱ्या कचरा संकलन व्यवस्थेचाही आढावा त्यांनी घेतला. या पाहणीत महानगरपालिका आणि ‘ह्युमन मॅट्रिक्स’ टीमकडून स्मार्ट फीडर पॉइंट्स विकसित करण्याच्या कामाची माहितीही आयुक्त राम यांनी घेतली.
‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ मोहिमे अंतर्गत पुणे महापालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून फिडर पाॅइंट्सची पाहणी केली जात आहे. या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ-१ चे उपायुक्त माधव जगताप, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, ह्यूमन मॅट्रिक्स व ‘स्वच्छ’ टीमचे पदाधिकारी उपस्थित होते.
या पाहणीनंतर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी या कामांसाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना करून क्षेत्रीय स्तरावर विशेष बैठकदेखील घेतली. महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील कचऱ्याचा बिकट झालेला प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून आयुक्त विशेष आग्रही आहेत. बाजारपेठेतील दुकाने रात्री बंद झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचा आग्रह आयुक्तांचा आहे.
यासाठी रात्रीच्या वेळी अनेकदा आयुक्तांनी जागेवर जाऊन भेट देऊन कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत आहे की नाही? याची पाहणी केली आहे. घनकचरा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करावी, यासाठी प्रयत्न करावेत, असा आग्रह महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी धरला आहे. त्यामुळे घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांना काही प्रमाणात शिस्त लागली आहे.