पुणे : मिळकतकरातील रद्द झालेली चाळीस टक्क्यांची सवलत लागू होण्याबरोबरच मिळकतकरामध्ये कोणतीही वाढ न करत महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणेकरांना दिलासा दिला आहे. एक एप्रिलपासून मिळकतकरातील चाळीस टक्क्यांची सवलतही कायम राहणार आहे. तसेच मिळकत कर वेळेत भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभासाठी एक कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

मिळकतकरामध्ये सरासरी ११ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून करण्यात आला होता. मात्र अंदाजपत्रक सादर करताना महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी करवाढीचा प्रस्ताव फेटाळला. करवाढ करण्याऐवजी मिळकतकर थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रशासनाने मिळकतकरामध्ये दरवर्षी १० ते १२ टक्के वाढ सुचविली होती. महापालिकेच्या स्थायी समितीने करवाढ दरवर्षी फेटाळली होती. गेल्या वर्षी मार्चपासून महापालिकेमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू झाल्यानंतर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ११ ते १५ टक्के मिळकत करवाढीचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र करवाढ न करता पुणेकरांना दिलासा देण्यात आला आहे.

Story img Loader