पुणे : कोविड रुग्णालयातील गुन्हेगारीचा पर्दाफाश; रुग्णांचे मोबाईल, दागिने चोरणाऱ्यांना अटक

अनेक रुग्णांचे मोबाईल, सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घडल्या घटना… रुग्णालयातील सीसीटीव्ही व्हिडीओ बघितल्यानंतर समोर आला सगळा प्रकार

pune crime news
अनेक रुग्णांचे मोबाईल, सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घडल्या घटना. (प्रातिनिधिक छायाचित्र)

करोनावर उपचार घेण्यासाठी कोविड रुग्णालयात गेलेल्या रुग्णांचे मोबाईल, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याचे प्रकार सातत्यानं घडत असल्यानं कोण चोरी करत असेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी कोविड रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली अन् कोण चोरी करतंय याचं उत्तर मिळालं. पुणे महानगरपालिकेनं बाणेर परिसरात उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हे सगळं घडलं.

उपचार घेणार्‍या अनेक रुग्णांचे मागील काही दिवसात पैसे, मोबाईल आणि सोन्याची दागिने चोरी झाल्याच्या घटना घडल्या. रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता साफसफाई करणारी एक महिला कर्मचारी चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. या कामात तिला एकजण साथ द्यायचा, त्यालाही अटक करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात या विषयावरून चर्चा सुरू झाली.

महिला आरोपी शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा. थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणी) असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात पुणे महानगरपालिकेने कोविड रुग्णालय ऑक्टोबर २०२० मध्ये उभारल्यानंतर एका संस्थेला चालविण्यास दिले. त्या रूग्णालयात ३०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. हे रुग्णालय कोविड रुग्णां करिता असल्याने रुग्णांशिवाय इतरांना आतमध्ये प्रवेश नाही.

दरम्यान, ऑक्टोबर ते आजअखेर येथे रूग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांचे पैसे आणि मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. त्याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी देखील आल्या होत्या. तक्रारींनंतर आतमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यात रुग्णाच्या बेडजवळ साफसफाई करताना शारदा अंबिलढगे ही चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आली. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिच्यासह साथ देणाऱ्या अनिल संगमे यालाही अटक करण्यात आली आहे. त्या दोघांची सध्या चौकशी सुरू असून, १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि ऐवज चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune municipal corporation baner covid hospital crime news pune police theft arrest bmh 90 svk

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा