पिंपरी : वाहतूक कोंडीच्या दृष्टीने ( जंक्शन इम्प्रूव्हमेंट) चाैक सुधारणा करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील अहिल्यादेवी हाेळकर (माेरवाडी) चाैकातील सेवा रस्ता प्लास्टिकचे खांब (बाेलार्ड), सिमेंटचे ब्लॉक टाकून अरूंद केल्याने वाहतूक काेंडीत प्रचंड भर पडत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे. चाैकातील प्लास्टिकचे खांब, ब्लाॅक हटविले असून, रस्ता माेकळा केला आहे. त्यामुळे वाहतूक काेंडी कमी हाेण्यास मदत झाल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी हाेळकर चौकात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यासाठी सिमेंटचे ब्लॉक, प्लास्टिकचे खांब टाकून पादचाऱ्यांच्या साेईसाठी रस्ता अरूंद केला हाेता. या उपाययाेजनांमुळे वाहतूक कोंडी कमी हाेण्याऐवजी त्यात भर पडली. पिंपरीतून माेरवाडी चाैक ओलांडण्यासाठी वाहनचालकांना वाहतूक नियंत्रण दिव्यापाशी (सिग्नल) किमान चार ते पाच वेळा लाल दिव्याला थांबावे लागत होते. वाहनांच्या माेठ्या रांगा लागत हाेत्या. त्यामुळे पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकातही कोंडी होत होती.

याच सेवा रस्त्यावर निगडी ते दापाेडी या बीआरटी मार्गातून जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यामुळे पीएमपी बसही सेवा रस्त्याने धावत आहेत. बस थांबा रस्त्यावरच आहे. प्रवाशीही रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करत थांबतात. परिणामी, पिंपरी आणि माेरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक काेंडी हाेत हाेती. महापालिकेच्या चौक सुधारण्याच्या या प्रयाेगाला आमदार, वाहनचालकांनी जाेरदार विराेध केला. काही संघटनांनी आंदाेलन केले. अखेरीस वाहतूक काेंडी आणि वाढता विराेध पाहता महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने चाचपणी पूर्ण झाल्याचा दावा करून खांब आणि सिमेंटचे ब्लॉक हटविले आहेत. त्यामुळे चालकांची कोंडीतून काहीशी सुटका झाली आहे.

पदपथ मोठे, रस्ते अरुंद

महापालिकेने पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते चिंचवडदरम्यान अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्त्यांची रचना केली आहे. यामुळे रस्ते अरूंद झाले असून, पदपथ माेठे झाले आहेत. त्यातच खांब, सिमेंटचे ब्लॉक टाकल्याने रस्ता आणखी अरूंद झाला. त्यामुळे मोरवाडी न्यायालयाची इमारत ते अहिल्यादेवी होळकर चौक आणि महामार्गावरील दाेन्ही बाजूला महापालिका मुख्यालयासमाेरच सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनांच्या रांग लागतात. सेवा रस्त्याच्या एकाच बाजूला पादचाऱ्यांसाठी महामेट्राेच्या पुलाचे आणि महापालिकेच्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. महामेट्राेचे स्थानकही याच परिसरात आहे. त्यामुळे कोडीत मोठी भर पडते.

चौकात सुधारणा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाहतूक काेंडीत भर पडत हाेती. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले हाेते. महापालिकेने सिमेंटचे ब्लाॅक, खांब हटविले आहेत, असे पिंपरीच्या वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पाेलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी सिमेंटचे ब्लाॅक, खांब टाकून काही दिवस चाचणी घेतली. यामुळे हाेणाऱ्या परिणामांचे निरीक्षण केले. मेट्राेच्या स्थानकामुळे प्रवाशांची गर्दी हाेत आहे. पादचाऱ्यांना वाहनांपासून दूर पदपथावर थांबता यावे, यासाठी नियाेजन केले हाेते. हा चाैक अतिधाेकादायक असून, गंभीर अपघात झाले आहेत. जलवाहिनी, मेट्राेचे काम पूर्ण झाल्यानंतर पाेलिसांच्या मान्यतेने पुन्हा या निर्णयाची अंलबजावणी करण्याचा विचार आहे. रिक्षाचालकांना थांब्यासाठी याेग्य ठिकाणी जागा देण्याचे नियाेजन सुरू असल्याचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.