पुणे : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात रुग्णालयांची साखळी असलेला सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार आहे. यासाठी ‘मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेस कंपनी’ने सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळविल्याची चर्चा आहे. या प्रकरणी महापालिकेने रुग्णालयाला जागा दिलेल्या कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्याकडे या व्यवहारासंबंधी कागदपत्रांसह सात दिवसांत खुलासा मागविला आहे.
एरडंवणा येथील फायनल प्लॉट नं. ३० येथील १९७६ चौरस मीटर जागा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांना ५३ लाख ३५ हजार २०० रुपये प्रिमीयम भरणा करण्याच्या व प्रत्येक वर्षी एक रुपया भाडे भरणा करण्याच्या अटीवर ९९ वर्षे कालावधीसाठी भाडेतत्त्वाने दिलेली आहे. हा जागेचा भाडे करारनामा महापालिका आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यात झालेला असून, तो दोन्ही संस्थांना बंधनकारक आहे. मात्र, या जागेवरील सह्याद्री हॉस्पिटलने परस्पर मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप यांना ही जागा हस्तांतरित केल्याची चर्चा आहे.
‘या करारनाम्यातील अट क्रमांक ८ मध्ये कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांना सदरच्या भाडेकराराने भाड्याने दिलेली जागा अगर तिचा कोणताही भाग, अथवा या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस भाड्याने, पोटभाड्याने, अथवा अन्य कोणत्याही प्रकारे व कोणत्याही कारणास्तव देता येणार नाही. मात्र, हॉस्पिटल योग्य रीतीने चालविण्याचे उद्देशाने सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य अशा संस्था, कंपनी यांचेबरोबर करारनामा करण्यास सवलत राहील, असे नमूद आहे.
मात्र, ही जागा कोणालाही गहाण, दान, बक्षीस करण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटल यांच्यासमवेत, तसेच सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेबरोबर करारनामा केला असल्यास त्याची प्रत, सदर जागा कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण, तारण ठेवली असल्यास त्याबाबतचे दस्त आणि यासाठी महापालिका आयुक्त यांची परवानगी घेतली असल्याची छायांकित प्रत, प्रीमियम रक्कम भरणा केल्याच्या प्रती पालिकेला पुढील सात दिवसांत सादर करा,’ अशी नोटीस पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला बजावली आहे. ‘प्रशासनाने सात दिवसांत उत्तर मागितले आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाला उत्तर दिले जाईल,’ असे कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने या संदर्भात म्हटले आहे.
सह्याद्री रुग्णालय ग्रूपचे मुख्य कायदेशीर अधिकारी डॉ. अमितकुमार खातू म्हणाले, या व्यवहाराचा महाराष्ट्रातील सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या कोणत्याही युनिटच्या कार्यपद्धती, सेवाभाव किंवा तत्त्वांवर कोणताही परिणाम होणार नाही. सध्या सुरू असलेला व्यवहार हा, सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड मधील इक्विटी शेअर्सच्या हस्तांतरणासंदर्भात आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे शेअर हस्तांतरण झाले आहेत आणि प्रत्येक वेळी रुग्णसेवा व हॉस्पिटलचे दैनंदिन कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरूच राहिले आहे.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे असलेले सह्याद्रि हॉस्पिटल हे, सह्याद्रि समूहातील एकमेव हॉस्पिटल आहे जे ट्रस्टच्या माध्यमातून चालवले जाते. याची रचना व कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. डेक्कन हॉस्पिटल ज्या जमिनीवर आहे ती जमीन पुणे महानगरपालिकेच्या मालकीची आहे व ती १९९८ साली ९९ वर्षांच्या करारानुसार ट्रस्टला भाडेतत्वावर देण्यात आली होती. हा भाडेकरार कायम आहे. लीज मिळवताना तत्कालीन प्रचलित बाजार दराने संपूर्ण लीज प्रीमियम आणि ९९ वर्षांसाठी त्या वेळचा संपूर्ण भाडेपट्टा ट्रस्टकडून भरण्यात आला होता.
महानगरपालिकेसोबतच्या करारानुसार, महापालिकेने संदर्भित केलेल्या सर्व रुग्णांना मोफत उपचार देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, आणि आम्ही ती पूर्णपणे पार पाडत आलो आहोत. मागील काही वर्षांत सरासरी २६० बेड दिवस रुग्णांना मोफत उपचाराची सेवा देण्यात आली आहे आणि एकही रुग्ण नाकारण्यात आलेला नाही.
डेक्कन जिमखाना हॉस्पिटल किंवा आमच्या इतर कोणत्याही हॉस्पिटलमधील दर्जेदार रुग्णसेवेवर किंवा उपलब्ध सेवांवर काहीही परिणाम होणार नाही. दररोज हजारो रुग्णांना आम्ही ज्या सहानुभूतीपूर्ण आणि सुलभ सेवेसह उपचार देतो, ती सेवा तितक्याच निष्ठेने सुरू राहील.