पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाची ख्याती केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील असल्याने यंदाचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. उत्सवाच्या काळात आवश्यक असलेल्या कामांची यादी महापालिका प्रशासनाने तयार केली असून त्यानुसार संबंधित विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली जात आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास गणेश मंडळांना, नागरिकांना होऊ नये, यासाठी मध्यवर्ती पेठांसह महत्त्वाच्या भागांना जोडणारे रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने यंदा केला आहे. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाणार आहे. याबरोबरच शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या सोयीसाठी ४०० ते ५०० मोबाईल टॉयलेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेेचेे अतिरिक्त आयुक्त जे. एम प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी. यांनी महापालिकेतील विभागप्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये खराब झालेले, खचलेले तसेच खाली-वर झालेल्या चेंबरची दुरुस्ती तातडीने करावी. भाविकांना चालण्यासाठी पदपथ अडथळे मुक्त केले जाणार आहेत. तसेच, सार्वजनिक स्वच्छतागृहाची रोज तीन वेळा स्वच्छता केली जाणार आहे. विसर्जन घाटावरील हौदाची स्वच्छता करण्याचे काम तातडीने करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

उत्सवासाठी विसर्जन घाटावर विजेचे दिवे आणि जनरेटरची सोय केली जाणार आहे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घाटावर सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. यासाठी लवकरच स्वंयसेवी संस्थाची बैठक घेतली जाणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

गणेश मूर्तींची विक्रेत्यांना ठेवावी लागणार नोंद

सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (पी.ओ.पी.) श्री गणेश मूर्तीची विक्री करताना विक्रेत्यांना त्याची नोंद ठेवणे आणि मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा स्वरुपात ऑईल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे बंधनकारक राहणार आहे. महापालिकेनेही गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

महापालिकेच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीओपी’च्या मूर्तींची विक्री करताना आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पत्रक महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.