पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उड्डाणपूल उभारले. मात्र, सध्या या रस्त्यावर पानमळा ते धायरीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्रास वाहने उभी केली जात असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर होणाऱ्या या पार्किंगकडे पोलिस आणि महापालिका कारवाई करण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार केली जात आहे.
सिंहगड रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या त्रासाला नागरिकांना आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागते. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने येथे रस्त्यावर उड्डाणपूल बांधले आहेत. गेल्या आठवड्यात राजाराम पूल चौक ते फनटाइम थिएटर दरम्यानचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहनचालकांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
उड्डाणपूल सुरू झाल्याने परिसरातील व्यावसायिकांना पुलाखाली मोकळी जागा झाली आहे. उड्डाणपुलाच्या खाली रस्ता दुभाजकाला लागून दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी वाहने तसेच टेम्पो उभे केले जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सिंहगड रस्त्याने सकाळी आणि सायंकाळी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने येथे वाहतूक कोंडी सदैव होते. नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल बांधले आहेत. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुलाखालील जागेत बेकायदा वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धायरी फाट्यापासून राजाराम पुलापर्यंत आणि पुढे पानमळ्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पदपथाला लागून बेकायदा चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. या पार्किंगमुळे धायरी फाटा ते वडगाव पूल, माणिक बाग ते आनंदनगर ते विठ्ठलवाडी आणि नवशा मारुती ते पानमळा यादरम्यान जागोजागी वाहतूक कोंडी होते.