पिंपरी : पवनेपेक्षा इंद्रायणीचे पाणी हे अधिक दूषित असल्याने महापालिकेला जलशुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला सुमारे दहा कोटी रुपये, तर इंद्रायणी नदीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रियेसाठी सात कोटी रुपये खर्च होत आहेत.

पवना धरणातून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथे शुद्ध करुन संपूर्ण शहराला वितरित केले जाते. पवना नदीतून दररोज ५१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. रासायनिक द्रव्य, पावडरचा वापर करुन पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी एका वर्षाला दहा कोटी रुपयांचा खर्च येतो. आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर पाणी हे निघोज येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून उचलले जाते. अशुद्ध पाणी भूमिगत जलवाहिनीतून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करुन समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध करण्यासाठी एका वर्षाला सात कोटी रुपयांचा खर्च येतो, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> पिंपरी : बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग, आयुक्त संतापले; म्हणाले…

आंद्रा धरण ते निघोजे बंधारा हे अंतर २२ किलोमीटर आहे. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूस ३४ गावे आहेत. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीचा परिसर आहे. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. सांडपाणी थेट नदीत मिसळते. औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रीत पाणीही नदीत सोडण्यात येते. इंद्रायणीचे पाणी जास्त दूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडरचा अधिक वापर करावा लागत आहे. परिणामी, इंद्रायणीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी सात कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर ३२ किलोमीटर आहे. पवना नदीच्या दोन्ही बाजूस बारा गावे आहेत. उर्सेत एमआयडीसी भाग असून मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नाहीत. त्यामुळे नदी पाणी प्रदूषित होते. मात्र, त्याचे प्रमाण इंद्रायणी नदीपेक्षा कमी असल्याने पाणी शुद्धीकरणास खर्च कमी येतो.