पुणे : महापालिकेची थकबाकी ठेवणाऱ्यांना अभय योजनेच्या माध्यमातून दंडामध्ये ७५ टक्के सवलत आणि नियमितपणे मिळकतकर भरणाऱ्यांना २५ टक्के सवलत का देत नाही, अशी विचारणा नागरी हक्क संस्थेने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
थकबाकीदार कर भरायला आल्यानंतर त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत त्यांना महापालिका पायघड्या घालते. मात्र जे नियमितपणे आणि न चुकता कर भरून महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करतात, त्यांच्यासाठी प्रशासन चार कौतुकाचे शब्दही काढत नाही, अशी टीका नागरी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीरकाका कुलकर्णी यांनी केली आहे.
शहरातील जुन्या हद्दीसह नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे महापालिकेच्या मिळकतकराची तब्बल १३ हजार कोटींची थकबाकी आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीत मिळकतकर न भरणाऱ्या मिळकतदारांकडून प्रत्येक महिन्याला दोन टक्के व्याज महापालिका दंड म्हणून घेते. त्यामुळे मूळ मिळकतकर आणि त्यावर आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
ही थकबाकी वसूल व्हावी आणि शहरात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक नवल किशोर राम यांनी मिळकतदार थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू केली आहे. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत ही योजना सुरू राहणार आहे. ही योजना सुरू करताना पहिल्याच दिवशी महापालिका प्रशासनाने थकबाकी भरण्यासाठी आलेल्या थकबाकीदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्यासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या योजनेचा फायदा घेत पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत थकबाकीदारांनी सहा कोटी २८ लाख रुपयांचा महसूल जमा केला.
महापालिका प्रशासनाने थकबाकीदार मिळकतदारांच्या केलेल्या स्वागतावर नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांसाठी पायघड्या घालण्याचे कारण का? अशी विचारणा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राम यांच्याकडे केली आहे. थकबाकी भरणाऱ्यांसाठी दंडात ७५ टक्के सवलत दिली जाते. मग नियमित मिळकतकर भरणाऱ्यांना किमान २५ टक्के सवलत द्यावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी महापालिका प्रशासनाने चार वेळा अभय योजना राबविली होती. मात्र केवळ मोजक्याच थकबाकीदारांनी यामध्ये कर भरला. विशेष म्हणजे महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेचा फायदा प्रत्येकवेळी तेच नागरिक घेत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.
वारंवार अभय योजनेचा फायदा घेत पुन्हा थकबाकीदार होणाऱ्यांवर महापालिका काय कारवाई करणार? महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आयुक्तांना ही योजना राबविण्यासाठी कोणी दबाब टाकला आहे का? अशी विचारणाही कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रशासनाने यादी प्रसिद्ध करावी
महापालिकेचा मिळकतकर थकविलेला आहे आणि ज्यांनी अभय योजनेचा फायदा घेत थकबाकी भरलेली आहे. त्यांची यादी महापालिका प्रशासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. यामुळे यापूर्वी अभय योजनेचा फायदा घेतलेले पुन्हा याचा फायदा घेत आहेत का? याचा उलगडा पुणेकरांना होईल, अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली. मिळकतकराची थकबाकी असलेल्यांना दंडात ७५ टक्के सवलत देताना महापालिकेने नियमित कर भरणाऱ्यांना २५ टक्के सवलत द्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
