पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दोन्ही बाजूला ४.५ मीटर रुंदीच्या रस्त्याची जागा ताब्यात घेतल्यानंतर रस्ता रुंदीकरणाला गती मिळणार आहे. त्यामुळे या भूसंपादनासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याबरोबर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वीही भूसंपादनासाठी वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. मात्र भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

पीएमआरडीएच्या प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांच्यासमवेत बैठक घेतली. त्या बैठकीत भूसंपादनला गती देण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रस्तावित मेट्रो मार्गिकेला अडथळा ठरत असल्याने विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला, मात्र आठ महिन्यानंतरही उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकले नसल्याची वस्तुस्थिती आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने लहान-मोठी पस्तीस कामे तातडीने करावीत. या कामांनंतरच उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ होईल, अशी भूमिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे.

उड्डाणपूल पाडण्यात आल्यानंतर वाहतूक सुधारणेचा आराखडा संयुक्त बैठकीत करण्यात आला. मात्र अद्यापही उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्याने वाहनचालकांना गैरसोयीला आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात पीएमआरडीए आणि महापालिका यांच्यात नियमित बैठका सत्र सुरू आहे. महापालिकेतही काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक झाली. त्या वेळी ३५ कामांची यादी पीएमआरडीएकडून महापालिकेला देण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण होणे शक्य नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आता भूसंपादनासाठी पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

रस्ता रुंदीकरण, पदपथांची रुंदी कमी करणे, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे अशी कामे करण्याचे नियोजित आहे. दरम्यान, भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे सुहास दिवसे यांनी बैठकीत सांगितले.

मेट्रोचे काम तीन वर्षांत

प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे सध्या तीन ठिकाणी काम सुरू आहे. या मार्गावर एकूण २३ मेट्रो स्थानके  आहेत. तसेच खांब उभारणीचे कामसुद्धा सुरू असून हिंजवडी येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे. तीन वर्षांत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे.