scorecardresearch

शहरातील सर्वात जुने वाचनालय होणार अद्ययावत!

पुणे नगर वाचन मंदिर हे शहरातील सर्वात जुने ग्रंथालय असून येथे अनेक दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही पुस्तके डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन करण्यात येणार आहेत.

 गेली १६६ वर्षे वाचनाची अभिरुची घडविण्याचे काम अव्याहतपणे करणाऱ्या पुणे नगर वाचन मंदिर या शहरातील जुन्या ग्रंथालयाने नव्या काळाशी सुसंगत होत आधुनिकीकरणाची कास धरली आहे. संस्थेच्या कार्याची आणि ग्रंथालयाची माहिती देणारे संकेतस्थळ विकसित केले असून दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटलायझेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने ग्रंथालयाच्या शाखांचा विस्तार करण्यात येणार आहे.
पुणे नगर वाचन मंदिर हे शहरातील सर्वात जुने ग्रंथालय असून येथे अनेक दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही पुस्तके डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन करण्यात येणार आहेत. पुढील महिन्यात याची सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात मार्चअखेरीस किमान ५० हजार पृष्ठांच्या मजकुराचे जतन करण्याचा मानस आहे. दरवर्षी दोन लाख या प्रमाणे या प्रकल्पासाठी पाच वर्षांत दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. संस्थेने भरत नाटय़ मंदिराजवळ जागा भाडय़ाने घेतली असून तेथे हा डिजिटलायझेशनचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये केवळ संस्थेतील ग्रंथांचा नव्हे तर, पुणेकरांकडे असलेल्या दुर्मिळ गंथांचेही डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह अरिवद रानडे यांनी दिली. त्यासाठी इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या पुणे नगर वाचन मंदिराने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला असून शाखा विस्तारीकरणावर भर दिला आहे. सदस्यांना पुस्तकांची देव-घेव करण्यासाठी शहरामध्ये येणे अवघड झाले असून लक्ष्मी रस्त्यावर वाहन लावण्यासही जागा मिळत नाही. ही बाब ध्यानात घेऊन संस्थेने शाखा सुरू केल्या आहेत. वारजे येथील श्रीराम सोसायटीजवळील गणेश ध्यान मंदिराच्या तळघरात एक वर्षांपासून शाखा कार्यरत असून बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरामध्ये नुकतीच शाखा सुरू केली आहे. या दोन्ही ठिकाणी ग्रंथ देव-घेव विभाग सुरू आहे. भविष्यामध्ये सिंहगड रस्ता, गोखलेनगर, विश्रांतवाडी आणि कोरेगाव पार्क येथेही शाखा सुरू करण्याचा मानस आहे, असेही रानडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune nagar vchan mandir up to date digitisation