scorecardresearch

“राज ठाकरे मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद”; पुण्यातील राष्ट्रवादीच्या मोर्चात जोरदार घोषणाबाजी

“ज्या पक्षाने मागील १५ वर्षांमध्ये स्वत:चा झेंडा दोनदा बदललाय, ब्रीद वाक्य दोनदा बदललंय त्या पक्षातील कार्यकर्त्यांची गळती आता थांबू शकत नाही.”

MNS NCP Pune
पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन झालं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या जाहीर सभेत मशीदींवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते. तसेच यावेळेस बोलताना राज ठाकरेंनी मशिदींवर त्याचप्रमाणे मदरशांवर छापे मारण्यासंदर्भात भाष्य केलेलं. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. यावेळी राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आले. तसेच वसंत मोरे जिंदाबादच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करत आपण अशाप्रकारे मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावणार नाही असं म्हटलं होतं.

मोरे यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना काही तासांमध्ये शहर अध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आलं. त्यांच्या जागी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सर्व घडामोडी घडत असताना पुणे शहरातील सर्वाधिक मुस्लिम समाज असलेल्या कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘राज ठाकरे मुर्दाबाद’बरोबरच ‘वसंत मोरे जिंदाबाद’च्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनामध्ये मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कठोर शब्दांमध्ये मनसेवर निशाणा साधला. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे विधान केले आहे ते निषेधार्थ असून दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. तर वसंत मोरे यांनी मुस्लीम समाजाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांना पदावरून बाजूला करण्यात आले आहे. एका चांगल्या कार्यकर्त्याने आणि नेत्याने भूमिका मांडल्यावर काय होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे,” असा टोला मोरेंच्या उचलबांगडीवरुन जगताप यांनी लागवलाय.

तसेच, “राज ठाकरेंविरोधात आज आम्ही आंदोलन केलं. २ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी मुंबईत भाषण करताना या राज्यात हिंदू मुस्लीम वाद पेटतील, दंगल घडेल अशाप्रकारच्या रणनितीचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. भाजपाची सी टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. त्यांनी तो जरुर करावा हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे. पण या राज्यात हजारो वर्षांपासून जो समुदाय एकत्र राहतो त्यांच्यात जो वेगळा भाईचारा आहे तो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चित करु नये,” असा सल्ला जगताप यांनी दिलाय.

“एक इशारा आम्ही नक्की देऊ की राजसाहेब तुम्ही या गोष्टींच्या माध्यमातून कितीही वाद पेटवण्याचा प्रयत्न केला तरी आता या गोष्टींना मतदार बधणार नाही. ज्या पक्षाने मागील १५ वर्षांमध्ये स्वत:चा झेंडा दोनदा बदललाय, ब्रीद वाक्य दोनदा बदललंय त्या पक्षातील कार्यकर्त्यांची गळती आता थांबू शकत नाही. त्यामुळेच भाजपाची कुबडी होण्याचं किंवा त्यांना कुबडी देण्याच काम राज ठाकरे करतायत हे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळेच या आंदोलनात आज हिंदू- मुस्लीम बांधव एकत्रित सहभागी झालेले,” असं जगताप यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune ncp protest against raj thackeray anti muslim comments svk 88 scsg