पुणे : पुणे महापालिका तसेच वाहतूक पोलीसाना कोणतीही पूर्वसूचना न देता सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलाकडे जाणारा रस्ता तीन दिवसांपूर्वी बंद करण्यात आला होता. पूर्वसूचना न देता पूल बंद करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली असून, तीन दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

राजाराम पूल तीन दिवसांपूर्वी सकाळी अचानकपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. हा पूल बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पूल बंद केल्याने महापालिकेच्या कारभारावर टीका केली जात होती. याची दखल घेऊन महापालिकेने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली.

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीवर असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हे पूल वापरासाठी सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. राजाराम पुलावरील ‘एक्स्टेंशन जॉइंट’चे काम करण्यासाठी प्रशासनाने ठेकेदाराला परवानगी दिली आहे. त्यानुसार या ठेकेदाराने वाहतूक पोलिसांकडे अर्ज केला. पोलिसांनी त्याला परवानगी दिल्यानंतर महापालिकेच्या प्रकल्प विभागाला व पोलिसांना पूर्वसूचना न देता ठेकेदाराने २८ एप्रिलला सकाळी आठ वाजता सिंहगड रस्त्यावरून कर्वे रस्त्याकडे राजाराम पुलावरून जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या प्रकरणाची महापालिकेच्या प्रकल्प विभागाने गांभीर्याने दखल घेतली. ‘संबंधित ठेकेदारास या वाहतूक कोंडीस जबाबदार कोण, याचा खुलासा करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली. खुलासा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे,’ असे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.