पुणे : मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडिंग स्पर्धा, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी ग्रँडसायकलिंग स्पर्धा, बारामती आणि इंदापूरला हाॅट एअर बलून फेस्टिव्हल, पवना धरण क्षेत्रात जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधा, साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या मोटरबोटिंग, झिपलायनिंगसारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती… अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेल्या पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचनेनुसार पर्यटन विकास आराखड्याचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला असून, त्याचे सादरीकरण अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. या वेळी अजित पवार यांचे सचिव डाॅ. राजेश देशमुख, डुडी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी ७० टक्के पर्यटक मुंबईला भेट देतात, तर अवघे १४ टक्के पर्यटक पुण्याला भेट देतात. त्यामुळे येत्या तीन वर्षांत जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ४० लाखांवर, तर पुढील पाच वर्षांत एक कोटीवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ५० हजार थेट रोजगार, तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील,’ असे पवार यांनी या वेळी सांगितले.आराखड्यासाठी पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्ती, संस्था आणि संघटनांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. राज्य सरकारकडूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान, श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि सिंहगड किल्ला समग्र संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

इतर राज्यांचाही अभ्यास

पर्यटन आराखडा करताना अन्य राज्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. गुजरातने कच्छच्या वाळवंटात ‘रणउत्सव’, अरुणाचल प्रदेशने झिरो व्हॅलीमध्ये ‘झिरो फेस्टिव्हल’, राजस्थानमधील जयपूरमध्ये ‘साहित्य महोत्सव’, नागालँडमध्ये ‘हाॅर्नबिल महोत्सव’ यांसारखे सुरू केलेले उपक्रम यशस्वी ठरले आहेत. त्यातून या राज्यांची आर्थिक उलाढालही वाढली असून, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली आहे.