पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे नेते माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. या तीनही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून दोन दिवसांपूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी ४२ हजारांचा निधी जमा केलेली पिशवी भेट म्हणून दिली. त्यावरून शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

कोथरूडमधील एका कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ४२ हजारांचा निधी रविंद्र धंगेकर यांना दिला आहे. त्यावर मुरलीधर मोहोळ म्हणाले की,आमचा पक्ष लोकशाही मानणारा असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तो मी मुरलीधर मोहोळ आहे. एका कार्यकर्त्याला पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खूप आनंदी असून देशात आमच्या ४०० हून अधिक खासदार निश्चित निवडून येणार आहेत. तसेच पुणे लोकसभेचा विचार करायचा झाल्यास पुण्यात केंद्र सरकारच्या विविध योजनेचा तब्बल अडीच लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. तसेच आजवर पुणेकर नागरिक नेहमीच भाजप पक्षाच्या पाठीशी राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पिंपरी : महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य! बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका

हेही वाचा – ‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…

मोहोळ पुढे म्हणाले की, कोथरूडमधील एका कार्यक्रमात कोणाला तरी (रविंद्र धंगेकर) नागरिकांनी निधी दिल्याचे सांगत असला, तर त्यावर मला बोलायच नाही. पण तुम्हाला (रविंद्र धंगेकर) निधी मिळाला म्हणजे प्रेम मिळाले असे होत नाही. पण माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात आणि काय आहात, हे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की, आम्ही पुणेकर नागरिकांचे मन जिंकले असून त्यामुळे सर्व नागरिक आमच्या सोबत असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.