पुणे : ‘गेल्या काही दिवसात ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली उत्तम क्रीडांगणे-नाट्यगृहे नाहीशी होत चालली असून, शहरांना मागास आणि बकालपणा आला आहे. त्यामुळे सध्याची तरुण पिढी शाळा, शिकवणी, फ्लॅट संस्कृतीच्या जीवनशैलीत गुरफटून लेचीपेची होत चालली आहे,’ अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. ‘या तरुण पिढीच्या जिवावर भारत जागतिक महासत्ता कसा होणार,’ असा प्रश्न त्यांनी रविवारी उपस्थित केला.

क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कबड्डीपटू शकुंतला खटावकर, व्हायोलियनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी जोशी बोलत होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश देसाई, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब साने, कार्यवाह सुनील नेवरेकर उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘समाज हे गुणवत्तेचे उद्यान आहे. आपली संस्कृती शरीर बलसंवर्धनाला पोषक आहे. माणूस ज्या वातावरणात वाढतो तसे त्याचे व्यक्तिमत्त्व तयार होत असते. क्रीडांगण हे केवळ मोकळे मैदान नाही, तर ती जीवनमूल्यांची पाठशाळा आहे. संघ, एकाग्रता, संयम यांचे संस्कार क्रीडांगणावर मिळतात. जीवनात कधी नैराश्य येऊ देत नाही. मात्र, स्मार्ट सिटीच्या नावाखाली क्रीडांगणे, नाट्यगृहे नाहीशी होत चालली आहेत. त्यामुळे तरुणांची खिलाडूवृत्ती संपुष्टात येत असून दहावी, बारावीच्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेहासारखे विकार बळावत चालले आहेत.’

खटावकर म्हणाल्या, ‘सध्याच्या तरुणाईमध्ये सातत्य, प्रचार आणि उत्तम संघटक, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांचा अंतर्भाव पाहिजे. परंतु, सध्याची पिढी शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये गुरफटलेली दिसते.‘कोणतीही आधुनिक कला अंगिकृत करताना जुन्या परंपरेची कास जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वाचन, अभ्यास यांचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फायदा करून घ्यावा,’ असे आवाहन पं. उपाध्ये यांनी केले. तर, समाजात विचार करण्याची क्षमता संपत चालली असल्याचा दाखला कुंभार यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नातून दिला.

‘राजकारणामुळे क्रीडा संस्कृतीचे अधःपतन’

क्रीडांगणावर प्रतिस्पर्ध्याने समोरच्याने कितीही कुटील डाव टाकले, तरी मनात आकस न बाळगता, वैरभावना न ठेवता त्याचा आदर करायचा ही संस्कृती आहे. पराभूत झालेल्या संघाचा कर्णधार विजयी झालेल्या संघाच्या कर्णधाराला हस्तांदोलन करतो, ही खिलाडूवृत्ती क्रीडा संस्कृती शिकवते. जेव्हा असे घडत नाही, तेव्हा त्या क्रीडा संस्कृतीचे अधःपतन होते. त्याचे प्रत्यंतर आजच्या राजकारणात दिसून येत आहे,’ असे डाॅ. जोशी यांनी सांगून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर घडलेल्या प्रसंगाची अप्रत्यक्ष आठवण करून दिली.