नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने शनिवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी (पीएमपीएमएल) नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि पीएमपीएमएलच्या कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. फटाके फोडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची ‘पीएमपीएमएल’साठी पूर्णवेळ अधिकारी दिल्याने गतवैभव प्राप्त होईल. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्यास मदत होईल. मुंढे यांनी येत्या काळात कामगारांचे आणि प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा महाराष्ट्र कामगार मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी व्यक्त केली. पुणे शहरातील सर्वाजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी आणि विविध स्वयंसेवी संस्थाकडून पीएमपीएमएलसाठी पूर्णवेळ अधिकारी द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. दीड वर्षांपूर्वी या पदावर श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारताच पीएमपीएमएलला नवसंजीवनी देण्याचे काम केले. मात्र त्याचदरम्यान त्यांना बढती देऊन पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यानंतर आता कोण येणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारने अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती केली. मात्र ते काही काळापुरतेच या पदावर राहिले. त्यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यानंतर तब्बल आठ महिने उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नव्हती. या कालावधीत अनेक वेळा राज्य सरकारकडे शहरातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी पूर्णवेळ अधिकारी द्यावा, अशी मागणी केली होती. या सर्वांच्या मागणीला आज अखेर यश आले असून आता तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी पारदर्शक कारभार करून नागरिकांची मने जिंकली होती. आता ते पुणे शहराच्या परिवहन सेवेला रुळावर आणतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pmpml new chief tukaram mundhe welcome pune
First published on: 25-03-2017 at 20:15 IST