पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे. मागील अवघ्या २० दिवसांमध्ये पोलीस आयुक्तालयातील विविध ठिकाणी धाड टाकून आत्तापर्यंत ३८ महिलांची सुटका सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे. याशिवाय पोलिसांनी १७ स्पा सेंटर चालक आणि मालकांना बेड्या ठोकल्या आहेत.

३१ डिसेंबरच्या रात्री सांगवीमध्ये धाड टाकून नेपाळी तरुणींची सुटका करण्यात आली. यात आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचं समोर आलं. या प्रकरणी स्पा सेंटर चालक-मालक पार्थ महंती, मॅनेजर शेख लतीफ या आरोपींना अटक करण्यात आले. सांगवी पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही मीटर अंतरावर हा गोरख धंदा सुरू होता. त्यामुळे तेथील पोलीस अधिकारी डोळे मिटून होते का? स्पा सेंटर हे पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात का? असs प्रश्न नागरिक विचारत आहेत.

महाराष्ट्रासह नेपाळ, आसाम, पश्चिम बंगालमधील महिलांचा समावेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवी सांगवी, कृष्णा चौक येथे ब्रीडल स्पा अँड ब्युटीमध्ये वेश्या व्यवसाय केला जात होता. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी देवेंद्र चव्हाण यांना मिळाली. यानंतर छापा टाकून नेपाळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील एक अशा एकूण ८ महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा सेंटर चालक पार्थ महंती आणि मॅनेजर लतीफ शेखला अटक करण्यात आली.

आतापर्यंत ३८ महिलांची सुटका, १७ चालक-मालकांना अटक

गेल्या २० दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी, तळेगाव, म्हाळुंगे, सांगवी, पिंपरी, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकण्यात आला. या कारवाईत आतापर्यंत ३८ महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना हडपसर येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण म्हणाले, “स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्यास तात्काळ सामाजिक सुरक्षा विभागाशी नागरिकांनी संपर्क करावा. त्याची दखल घेऊन संबंधित स्पा सेंटरवर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत ३८ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच १७ जणांना अटक करण्यात आली.”