आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत मुळा नदीलगत असलेल्या एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असल्याने रात्रभर हिंजवडी पोलिसांना त्या कुजलेल्या मृतदेहाला राखण करत बसावं लागलं आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची टीम दाखल होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलीय. 

हिंजवडी लगत असलेल्या मान येथे मुळा नदीच्या कडेला असणाऱ्या एका उंबराच्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत बुधवारी एक मृतदेह आढळला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून तो मृतदेह लटकलेला असावा असा अंदाज हिंजवडी पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेहाच्या अंगावर गाऊन असल्याने तो महिलेचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा मृतदेह बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आढळून आला.

कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाजवळ हिंजवडी पोलिसांना राखण करत बसावं लागलं. अद्याप हा खून आहे की आत्महत्या हे स्पष्ट झालेले नाही. मृतदेह पुराच्या पाण्यातून वाहून येऊ शकतो आणि झाडाला लटकून राहू शकतो, अश्या अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. परंतु, नेमकं त्या महिलेचा खून झाला आहे की तिने आत्महत्या केलीय हे शोधण्याच मोठं आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह मुळा नदी पत्रातील झाडाच्या फांदीवर लटकवला आहे, असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रमेश गेहलोत यांनी फिर्याद दिली आहे.