पुणे : ‘शहरातील लाॅज, हाॅटेलमध्ये वास्तव्यास येणाऱ्या ग्राहकांंना ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये. ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्यास कारवाई करू,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी याबाबतचा आदेश दिला आहे. शहरातील अनेक लाॅज, हाॅटेलमध्ये ओळखपत्राशिवाय ग्राहकांना प्रवेश देण्यात येतो. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दक्षतेचा आदेश दिला आहे. उपनगरातील कात्रज, हांडेवाडी, नऱ्हे परिसरात लाॅज, हाॅटेलची संख्या जास्त आहे.

पुणे शहर, तसेच उपनगरातील सर्व लाॅज, हाॅटेलचालकांनी ग्राहकांकडून ओळखपत्र घ्यावे, तसेच ओळख पटवून, नाव नोंदवून त्यांना प्रवेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास संबंधित लाॅज, हाॅटेलचालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हांडेवाडी, उंड्री परिसरातील लाॅजचालकांची बैठक शुक्रवारी आयोजित केली. या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी मार्गदर्शन केले. ओळखपत्राशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.