कृष्णा पांचाळ

सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. देशात, राज्यात करोनाने थैमान घातले असून सर्वांनी घरात बसावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. परंतु, काही व्यक्तींना ते शक्य होत नाही. एवढेच नव्हे तर आपले कुटुंबही सुरक्षित राहावे यासाठीही झटाव लागतं. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या गेल्या अडीच वर्षांपासून हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पुण्यातही करोनाने थैमान घातले असून या भीतीने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला स्वतः पासून अडीचशे किलोमीटर दूर ठेवले आहे. एक अधिकारी म्हणून नाही तर एक सजक आई म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे त्या सांगतात. आज त्या एकट्याच असून या ठिकाणी त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबीयांनीही नोकरी सोडून घरी परतण्यास सांगितल्याचं त्या म्हणतात.

कविता रुपनर या गेल्या अडीच वर्षांपासून हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. त्या पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून पिंपरी-चिंचवडमध्ये त्याचा आकडा १२ वर पोहचला आहे. याच भीतीने त्यांनी एक सजक आई म्हणून आपल्या दीड वर्षीय इशाला इच्छा नसतानाही आजोळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, तिला करमणार नाही म्हणून पतीलाला तिच्या सोबत पाठवून दिले. मी सर्वांना माझ्यापासून वेगळे केले आहे. मला कर्तव्य बजावण्यासाठी सध्या बाहेर फिरावे लागत आहे. करोना हा संसर्ग जन्य विषाणू आहे त्यामुळे चिमुकलीचा जीव धोक्यात घालू इच्छित नव्हते, असे कविता रुपनर म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


चिमुकल्या इशाला कविता यांना जवळ घेता येत नाही. परंतु, तिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे त्या दररोज संपर्क साधतात. हे सर्व पाहून त्यांना कुटुंबातील व्यक्ती ही नोकरी सोडून घरी ये अस म्हणत आहेत. उद्या त्यांना काय झाले तर आम्हाला कोण आहे असे कुटुंबीय म्हणत असल्याने कविता द्विधा मनस्थितीत सापडल्या आहेत. परंतु, हे सर्व विसरून त्या कर्तव्य बजावत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. आम्ही सर्व पोलीस दल तुमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर आहोत. तुम्ही कृपया करून तुमच्या स्वतःच्या जीवासाठी घरात बसा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत चीन आणि इटली सारखी परिस्थिती आपल्या देशाची होऊ द्यायची नाही, असंही त्या म्हणाल्या.