राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला. हत्येनंतर फरार झालेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली. यात त्यांनी राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचं कारणही सांगितलं. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी (२२ जून) पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचे तपशील सांगितले.
अंकित गोयल म्हणाले, “आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला. दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपीला राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं. दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.”
आरोपी राहुल हंडोरे कोण आहे?
“आरोपीही एमपीएससीची तयारी करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रुममध्ये रहात होता. दोघांची ओळख लहानपणापासून होती,” अशी माहिती अंकित गोयल यांनी दिली.
हेही वाचा : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेल्या दर्शनाची हत्या; शेवटच्या भाषणात म्हणालेली, “मला…”
व्हिडीओ पाहा :
“दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर”
“दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर होतं. त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती. दोघांचं प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल,” असंही अधीक्षक गोयल यांनी नमूद केलं.