मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्यामुळेच पुणे शहराचे अनेक प्रश्न शासनाकडे रखडले आहेत आणि पुण्याच्या रखडलेल्या प्रश्नांना सर्वस्वी मुख्यमंत्रीच सर्वस्वी जबाबदार आहेत. मुख्यमंत्री अनेकदा पुण्यात येऊन गेले; प्रश्न काही मार्गी लागले नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादांनी रविवारी बाबांना लक्ष्य केले.
महापालिकेतर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी दादा रविवारी पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्याच्या रखडलेल्या प्रश्नांसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच जबाबदार धरले. महापालिका हद्दीत नव्याने तेवीस गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांमुळेच रखडला आहे. ती फाइल मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी त्यांच्या खात्यातच थांबली आहे. विकास योग्य पद्धतीने करायचा असेल, तर निर्णय तातडीने घेणे आवश्यक असते. अन्यथा प्रकल्पांची, कामांची किंमत वाढत जाते. मात्र, राज्य शासनाकडून असे निर्णय लवकर होत नसल्यामुळे अनेक अडथळे उभे राहत आहेत. अनेक निर्णयांबाबत मुख्यमंत्री फक्त ‘बघू’ असे आश्वासन देतात. जाहीर कार्यक्रमांसाठी ते अनेकदा पुण्यातही येतात. मात्र, प्रस्ताव प्रलंबितच आहेत, अशा शब्दात दादांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांसंबंधी आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्याबाबतही निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; पण निर्णय काही झाले नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियमावली देखील रखडली आहे. कामाची संधी मिळाली, तर कामे तत्परतेने मार्गी लावता येतात. काही दिवसांनंतर आता आचारसंहिता लागेल. मग कामे वेळेत कशी पूर्ण करता येतील, असाही प्रश्न दादांनी उपस्थित केला.