पुणे : रेल्वेतून विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेकडून यंदाही जोरदार कारवाई करण्यात आली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांत पुणे रेल्वेने तब्बव २ लाख १७ हजार ६३३ फुकटय़ा प्रवाशांना पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल १० कोटी ९४ लाख ६६ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये नियमितपणे प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली जाते. पुणे विभागातील उपनगरीय गाडय़ांमध्ये, त्याचप्रमाणे फलाटावर सातत्याने विशेष मोहिमांद्वारे तिकिटांची तापासणी केली जाते. यात तिकीटच नसणारे प्रवासी, प्रवासाचे योग्य तिकीट न घेणारे, त्याचप्रमाणे बरोबरील साहित्याचे नियमानुसार तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांना पकडले जाते. त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची आकारणी केली जाते. दंड न भरल्यास प्रवाशाला तुरुंगात टाकण्याचीही कारवाई केली जाते.

सरलेल्या २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षांतील फुकटय़ा प्रवाशांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी पुणे रेल्वेने जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत २ लाख १७ हजार ६३३ प्रवाशांवरील कारवाईत १० कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये दंड वसूल झाला. त्याचप्रमाणे अनियमित प्रवास करणाऱ्या १९७ प्रवाशांकडून ९३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जवळील साहित्याचे योग्य तिकीट न काढणाऱ्या एक

हजार ४१४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख १३ हजार रुपयांचा दंड घेण्यात आला.

एकूण सर्व प्रकारणांमध्ये पुणे रेल्वेकडून एकूण १० कोटी ९७ लाख ७३ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. तिकीट तपासनिसांसाठी आर्थिक वर्षांत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिकच्या दंडाची वसुली करण्यात आल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रजेश कुमार सिंह, प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. व्ही. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

तिकीट तपासनिसांचाही विक्रम

पुणे रेल्वेत तीन तिकीट तपासनिसांनी वर्षभरात सर्वाधिक फुकटे प्रवासी पकडले आहेत. त्यात टी. एस. मालुसरे यांनी ७८६४ प्रकरणात ४१.९६ लाख रुपये दंडाची वसुली केली. त्यापाठोपाठ आल्विन ध्यान प्रकाश यांनी ७२३३ प्रकारणांत ४०.८७ लाख, तर एस. एस. क्षीरसागर यांनी ६२३० प्रकरणांत ३४.४५ लाख रुपयांच्या दंडाची वसुली केली.