तीसहून अधिक गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम; दीड ते दोन तासांनी विलंब

पुणे रेल्वे स्थानकावरील सिग्नलची यंत्रणा बंद पडल्याने गुरुवारी सकाळपासूनच रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकाराचा फटका तीसहून अधिक एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडय़ांना बसला. या सर्वच गाडय़ा दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या, तर दोन लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पुणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याने दुपारी तीननंतर वाहतूक सुरळीत होऊ शकली.

पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस पुण्यातून सुटल्यानंतर सकाळी सव्वासातच्या सुमारास सिग्नल यंत्रणेतील पॅनल स्वीच बंद पडल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यंत्रणेतील  बिघाड लक्षात येताच तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सिग्नल केबिनकडे धाव घेतली. स्वीच बंद पडल्याचे लक्षात आल्याने पर्यायी स्वीच सुरू करण्यात आला. मात्र, तोही बंद पडल्याने मोठी समस्या निर्माण झाली. संपूर्ण वाहतूकच ठप्प झाल्याने पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

यंत्रणेतील नादुरुस्तीचा फटका २५ मेल व एक्स्प्रेस गाडय़ा आणि नऊ पॅसेंजर गाडय़ांना बसला. पुणे-लोणावळा मार्गावर धावणाऱ्या दोन लोकल रद्द करण्यात आल्या. डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस आदी गाडय़ांसह लांब पल्ल्याच्या गाडय़ांना दीड ते दोन तासांचा उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर गाडय़ांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची दिवसभर मोठी गर्दी झाली होती.