खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी काहीसा ओसरला. दमदार पाऊस शनिवारीही कायम होता. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये तब्बल १.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ८.१९ टीएमसी म्हणजेच २८.११ टक्क्यांवर पोहोचला.
हेही वाचा- “उठसूट सर्वच निर्णय रद्द करायचे नसतात”; अजित पवारांची सरकारवर टीका
पुढील पाच दिवस धरणक्षेत्रांत मुसळधार पावसाचा अंदाज
दरम्यान, खडकवासला धरण ६१ टक्के भरले असून खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यातून ५०० क्युसेक या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. पुढील पाच दिवस धरणक्षेत्रांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे धरणांमध्ये जुलैअखेरपर्यंत समाधानकारक पाणीसाठा जमा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- ओबीसी आरक्षणाखेरीज निवडणुका झाल्यास उद्रेक; काँग्रेस ओबीसी शाखेच्या प्रदेशाध्यक्षांचा इशारा
समाधानकारक पाणीसाठा
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. शनिवारी सायंकाळपर्यंत या चारही धरणांमध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६.९५ टीएमसी म्हणजेच २३.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी सायंकाळपर्यंत हा पाणीसाठा ८. १९ टीएमसीपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६६ टीएमसी म्हणजेच २९.७१ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ०.४७ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या काळात मुसळधार पाऊस पडून समाधानकारक पाणीसाठा जमा होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३५ मि.मी., वरसगावमध्ये २३ मि.मी. पानशेमध्ये २० मि.मी. तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.