* पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस * पहिल्याच पावसात रस्त्यांच्या नद्या!

आठवडय़ाभरापासून पुणेकरांना लागून राहिलेली मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा अखेर सोमवारी संपली. सोमवारी दुपारी आणि संध्याकाळीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुण्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. हा पाऊस उकाडय़ात दिलासा देऊन गेला असला तरी पहिल्याच पावसात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे त्यातून वाट काढताना झालेली अडचण आणि वाहतूक कोंडी अशा दुहेरी त्रासाचा सामना वाहनचालकांना करावा लागला.

सोमवारी सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे प्रचंड अंधारून आले होते. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास शहराच्या बऱ्याच भागात जोराचा पाऊस पडू लागला. हा पाऊस बराच वेळ पडत राहिला. पावसाच्या सरी दमदार असल्यामुळे काहीच वेळात अनेक प्रमुख रस्ते व गल्ल्यांमध्येही पाणी साचले. काही ठिकाणी इतके पाणी साचले होते, की दुचाकी चालकांना त्यातून वाहन चालवणे जिकिरीचे होऊन बसले. पावसानंतर ठिकठिकाणच्या चौकांमधील वाहतूक नियंत्रक यंत्रणा बंद पडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळीही काही भागात पावसाच्या सरी पडल्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यात २७ मिमी पावसाची नोंद झाली.

पिंपरी-चिंचवडमध्येही दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या भागातही गेल्या चार-पाच दिवसापासून उकाडा आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, पावसामुळे शहरामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मंगळवारीही पुण्यात थांबून-थांबून पाऊस पडेल, तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरही आठवडाभर दररोज पावसाच्या सरी हजेरी लावणार आहेत.