पुणे : पुण्यात घरांच्या विक्री किमतीपेक्षा भाडेवाढीचा वेग जास्त आहे. गेल्या चार वर्षांत पुण्यातील हिंजवडी आणि वाघोली भागात घरांच्या किमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी याच भागात घरभाड्यात ६० ते ७० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आयटी पार्क परिसरात घरांच्या किमती आणि घरभाडे अधिक आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, रोजगारातील वाढ आणि पायाभूत सुविधांचा वेगाने होणारा विकास यामुळे महानगरांमध्ये गृहनिर्माण बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत तेजीचे वारे होते. यामुळे घरांच्या किमतीसह भाड्यातही सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यात हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि वाघोलीतील आयटी पार्क यामुळे या परिसरात घरांच्या किमतीत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ सुरू आहे. त्याच वेळी आयटी पार्कमुळे या परिसरात रोजगारासाठी स्थलांतरितांची संख्या वाढल्याने भाड्याच्या घरांनाही मागणी अधिक आहे.

हिंजवडीत घरांची सरासरी किंमत २०२१ च्या अखेरीस प्रतिचौरस फूट ५ हजार ७१० रुपये होती. ती जून २०२५ अखेरीस ४० टक्क्यांनी वाढून ८ हजार रुपयांवर पोहोचली. त्याच वेळी वाघोलीत घरांची सरासरी किंमत २०२१च्या अखेरीस प्रतिचौरस फूट ४ हजार ९५१ रुपये होती. ती जून २०२५ च्या अखेरीस ४० टक्क्यांनी वाढून ६ हजार ९४० रुपयांवर गेली.

हिंजवडीत २ बीएचके (१ हजार चौरस फूट) घराचे भाडे २०२१ च्या अखेरीस १७ हजार ८०० रुपये होते. ते जून २०२५ च्या अखेरीस ६० टक्क्यांनी वाढून २८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. तर, वाघोलीत २ बीएचके घराचे भाडे २०२१ च्या अखेरीस १४ हजार २०० रुपये होते. ते जून २०२५ च्या अखेरीस ६९ टक्क्यांनी वाढून २४ हजारांवर पोहोचले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देशातील महानगरांमध्ये आगामी काळात घरांच्या किमतीतील वार्षिक वाढ ६ ते ७ टक्के राहील. त्याच वेळी घरभाड्यातील वाढ ७ ते १० टक्के राहील. मेट्रो मार्गिकांसह इतर पायाभूत सुविधांचा विस्तार होत असलेल्या ठिकाणी ग्राहकांकडून घरांना जास्त पसंती दिली जात आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

पुण्यातील २ बीएचके घराचे गणित

भाग – सरासरी किंमत (प्रतिचौरस फूट) – सरासरी मासिक भाडे

  • हिंजवडी – रु. ८,००० – रु. २८,५००
  • वाघोली – रु. ६,९४० – रु. २४,०००